Published on
:
16 Nov 2024, 12:28 am
Updated on
:
16 Nov 2024, 12:28 am
आधुनिक जीवनशैलीमुळे शरीरावर आणि मनावर ताण येणे क्रमप्राप्त झाले आहे. याचबरोबर असंतुलित आहार, अपुरी झोप यामुळेही आरोग्याच्या वेगवेगळ्या तक्रारी कानांवर पडू लागल्या आहेत. विषाणूंची संख्या शरीरात वाढू लागल्यामुळे शरीराच्या प्रतिकारशक्तीवर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. यामुळेच प्रोबायोटिक फूडचे महत्त्व वाढले आहे.
आपल्या शरीराला निरोगी राखण्यात प्रोबायोटिक फूड महत्त्वाची भूमिका बजावते. सबब, आज अनेक कंपन्यांनी प्रोबायोटिक दूध, दही आणि अन्य खाद्यपदार्थ बाजारात आणले आहेत. प्रोबायोटिक या संकल्पनेचा पहिला वापर 1950 मध्ये करण्यात आला. शरीराच्या द़ृष्टीने उपयुक्त असणार्या जीवाणूंसाठी या संकल्पनेचा वापर केला गेला. शरीराच्या द़ृष्टीने हितकारी नसलेल्या जीवाणूंना नष्ट करण्यासाठी प्रोबायोटिक या संकल्पनेचा जन्म झाला. प्रोबायोटिक नामक प्रक्रियेतून आपण घेत असलेल्या अन्नाद्वारे शरीराला उपयुक्त घटकांचा वापर करून घेण्याचे काम करण्यात येते. शरीराला आवश्यक असलेल्या फॅटी अॅसिडची निर्मितीही या प्रक्रियेद्वारे होते. याचबरोबर रक्तात तयार झालेली विषद्रव्ये शरीराबाहेर काढण्याचे कामही ही प्रक्रिया करते.
केळी, कांदा, लसूण, मध या पदार्थांमध्ये शरीरातील प्रोबायोटिक अन्नाचे प्रमाण वाढवण्याची क्षमता असते. त्यामुळे या पदार्थांचा दैनंदिन आहारातील वापर वाढवणे आवश्यक आहे. प्रोबायोटिक खाद्यपदार्थांचा वापर अलीकडे चांगलाच वाढला आहे. त्यामुळेच मागे केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये अशा पदार्थांवरील मूळ सीमाशुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अनेक वैद्यकीय संशोधनांमधून प्रोबायोटिक अन्नाचे महत्त्व सिद्ध होऊ लागले आहे. ‘ब्रिटिश जर्नल ऑफ डर्मेटॉलॉजी’ या नियतकालिकाने केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की, गर्भावस्थेत महिलेने दररोज एक ग्लास प्रोबायोटिक दूध पिल्यास होणार्या बाळाला अनेक आजारांपासून दूर ठेवता येऊ शकते. लहान वयात प्रतिकार क्षमतेच्या अभावामुळे मुलांना अनेक व्याधींना आणि आजारांना तोंड द्यावे लागते. आईने गर्भावस्थेदरम्यान प्रोबायोटिक खाद्यपदार्थांचा समावेश आहारात केला असेल, तर लहानपणी होणार्या अनेक आजारांपासून आपल्या मुलाला दूर ठेवता येते. इसबसारख्या त्वचारोगांपासून लहान मुलांचा बचावही करता येतो.
प्रोबायोटिक अन्नामुळे शरीरामधील जीवाणूंचे संतुलन कायम राहू शकते. शरीराची प्रतिकार क्षमता वाढवण्याचे काम अशा प्रकारच्या अन्नामुळे केले जाते. लहान मुलांना अतिसार झाल्यास असे अन्न उपयुक्त ठरते. आतड्यांची कार्यपद्धती सुधारण्यास या अन्नाचा उपयोग होतो. मूत्राशयाचा कर्करोगापासून बचाव करण्याचे कामही हे अन्न करते. आपल्या पचनक्रियेत 500 हून अधिक प्रकारचे जीवाणू असतात. अन्नाचे पचन चांगले व्हावे यासाठी हे जीवाणू काम करतात. निरोगी आरोग्यासाठी शरीरातील विषाणू आणि जीवाणूंचे संतुलन राखणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. हे काम प्रोबायोटिक फूडमुळे शक्य आहे. शरीर आणि मनावरील तणाव, आजारपण, प्रतिजैविकांचा (अॅन्टिबायोटिक्स) अतिवापर, सदोष जीवनशैली, असंतुलित आहार, अपुरी झोप यामुळे शरीरातील विषाणूंचे प्रमाण वाढते. हे प्रमाण कमी करण्याचे काम प्रोबायोटिक फूड करते.