Published on
:
24 Jan 2025, 1:00 am
Updated on
:
24 Jan 2025, 1:00 am
नवी दिल्ली : हिवाळा आला की बाजारात द्राक्षेही येऊ लागतात. केवळ चवीसाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही द्राक्षे गुणकारी असल्याचे तज्ज्ञ सांगतात. विशेषतः फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी द्राक्षे लाभदायक ठरतात. द्राक्ष्यांमध्ये अँटीऑक्सीडंटस्, फ्लेवोनॉईडस्, ‘क’ जीवनसत्व आणि अन्य अनेक पोषक तत्त्वे असतात. ते श्वसनसंस्था मजबूत ठेवतात. तसेच शरीरातून विषारी घटक बाहेर काढण्यासाठी मदत करतात.
द्राक्ष्यांमध्ये रेस्वेराट्रॉलसारखे अँटीऑक्सिडंटस् आणि फ्लेवोनॉयडस् असतात. ते शरीरातील सूज तसेच ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात. ते फुफ्फुसांचे फ्री रॅडिकल्समुळे होणार्या हानीपासून संरक्षण देतात. तसेच फुफ्फुसांची क्षमता सुधारतात. द्राक्ष्यांमधील ‘क’ जीवनसत्व, अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इंफ्लेमेटरी गुण शरीराचे संक्रमण आणि सूज (उदा. ब्राँकायटीस) यापासून रक्षण करतात. द्राक्ष्यांमध्ये क्वेरसेटिन नावाचे फ्लेवोनॉईड असते जे श्वसनमार्गाचे आरोग्य सुधारतात. त्यामुळे अॅलर्जी आणि अस्थमासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. द्राक्ष्यांमध्ये कमी कॅलरीज आणि फायबर असतात, जे वजन नियंत्रित करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे फुफ्फुसांचे कार्य सुधारते. वजन अधिक असल्यास फुफ्फुसांवर दाब वाढू शकतो. द्राक्ष्यांमध्ये पाण्याचे प्रमाणही चांगले असते, जे शरीरामधून विषारी घटक बाहेर काढते. द्राक्ष्यांमध्ये पोटॅशियमही चांगल्या प्रमाणात असते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी मदत करते.