बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकीFile Photo
Published on
:
28 Nov 2024, 9:55 am
Updated on
:
28 Nov 2024, 9:55 am
प्रेयसी व योग शिक्षकाने बलात्काराच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिल्याने चाकणमधील तरुणाने लोणावळ्यातील दरीत उडी मारून आत्महत्या केली होती. सूर्यकांत रामदयाल प्रजापती (वय 27, रा. श्रीरामनगर, चाकण) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचा भाऊ श्रीकांत रामदयाल प्रजापती (वय 25, रा. चाकण, ता. खेड) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी योगा शिक्षक बापू सोनवणे (रा. चाकण, ता. खेड) व प्रेयसीवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 17 ऑक्टोबर 2024 रोजी घडली होती.
सूर्यकांतला आपल्या प्रेयसीचे दुसर्या तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याचा संशय होता. त्याबाबत त्याने विचारणा केल्यावर प्रेयसी व योगा शिक्षकाने त्याला बलात्काराच्या खोट्या प्रकरणात अडकविण्याची धमकी दिली. टेलिग्राम अॅप, व्हॉट्सअॅप, गुगल पे आदींवर घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करून अपमान केला. या त्रासाला कंटाळून त्याने 9 ऑक्टोबर रोजी चाकण येथील घर सोडले. त्याचे नातेवाईक सूर्यकांत याचा शोध घेत होते. त्यानंतर 16 ऑक्टोबर रोजी त्याने दोन सेकंदांचा व्हिडिओ काढून आपल्या नातेवाइकांना पाठविला होता.
दोन सेकंदांच्या व्हिडीओवरून उलगडा
सूर्यकांत याने आत्महत्या करण्यापूर्वी अवघ्या दोन सेकंदांचा व्हिडीओ तयार करून तो आपल्या कुटुंबीयांच्या मोबाईलवर पाठवला होता. या व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या बॅकग्राउंडवरून सूर्यकांत याच्या आत्महत्येचा शोध लागला. या व्हिडीओवरून लोणावळा येथील शिवदुर्गच्या पथकाने राजमाची दरीत 370 फूट खोल दरीत शोध घेऊन त्याचा मृतदेह बाहेर काढला होता.