बांदलादेशमधून हिंदुस्थानात अवैध पद्धतीने घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या घुसखोरांनी BSF (सीमा सुरक्षा दल) जवानांच्या तुकडीवर बुधवारी पहाटे हल्ला केला आहे. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला आहे. घुसखोरांनी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर लाठ्या, काठ्या आणि धारधार शस्त्रांनी हल्ला चढवला. त्यांच्याकडे वायर कटरही होते. पश्चिम बंगालच्या सीमेवरून हिंदुस्थानाच अवैध वस्तूंची तस्करी करण्यासाठी किंवा करोड्याच्या हेतूने ही घुसखोरी होत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
पश्चिम बंगालच्या सीमेवर गस्त घालणाऱ्या बीएसएफच्या गस्ती पथकावर बुधवारी सकाळी बांगलादेशी घुसखोरांनी हल्ला केला. त्यात एक जवान जखमी झाला. घुसखोर मोठ्या संख्येने काठ्या घेऊन आले होते आणि त्यांच्याकडे वायर कटरही होते. घुसखोर हिंदुस्थानी सीमेत घुसत असताना बीएसएफ जवानांनी त्यांना इशारा देत रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, घुसखोर आक्रमक झाले आणि त्यांनी बीएसएफ पथकावरच हल्ला चढवला.
दक्षिण दिनाजपूर जवळील मलिकपूर गावात बांगलादेशी गुन्हेगारांच्या एका गटाने तस्करी किंवा दरोडा टाकण्याचा बेकायदेशीर प्रयत्न केला. बीएसएफ जवानांनी त्यांना हिंदुस्थानी सीमेत प्रवेश करताना पाहिले आणि त्यांना रोखण्यासाठी इशारा दिला. मात्र, घुसखोरांनी आक्रमक होत बीएसएफ जवानांवर हल्ला केला. त्यांना रोखण्यासाठी बीएसएफच्या जवानांनी प्राणघातक नसलेल्या दारूगोळ्याने गोळीबार केला. मात्र, बांगलादेशी घुसखोरांनी त्याला जुमानले नाही आणि बीएसएफच्या पथकाला घेरले. हल्लेखोरांनी बीएसएफ जवानांचे डब्ल्यूपीएन हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि या झटापटीत बीएसएफ जवान जखमी झाले. प्रसंगाचे गांभीर्य ओळखत आणि आपल्या जीवाला धोका असल्याचे लक्षात येताच, बीएसएफ जवानांनी स्वसंरक्षणार्थ बांगलादेशी घुसखोरांवर गोळीबार केला. त्यामुळे त्यांनी पळ काढला.
घुसखोर पळून गेल्यानंतर बीएसएफ पथकाने भागात शोध घेतला, तेव्हा एक बांगलादेशी घुसखोर जखमी अवस्थेत आढळला. त्याला बीएसएफने गंगारामपूर रुग्णालयात उपचारासाठी नेले. घटनास्थळावरून शस्त्रे, काठ्या आणि वायर कटर जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय एका जखमी सैनिकालाही रुग्णालयात नेण्यात आले. याआधीही अनेकदा बांगलादेशी घुसखोरानी हिंदुस्थानात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे. दरवेळी बीएसएफ जवानांनी त्यांना सीमेवर रोखले आणि आणि शेजारच्या देशात परत पाठवण्यात आले आहे.