Published on
:
21 Jan 2025, 1:14 am
Updated on
:
21 Jan 2025, 1:14 am
चिपळूण : अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून हल्ला करणार्या आरोपीला पकडले असून तो बांगलादेशी असल्याचे पुढे आले आहे. मात्र, त्या आधीपासून रत्नागिरी जिल्ह्यात घुसखोर बांगलादेशींविरोधात पोलिसांनी व दहशतवाद विरोधी पथकाने मोहीम उघडली आहे. चिपळूणमध्ये देखील यापूर्वी सात ते आठ बांगलादेशी सापडले होते. मात्र, त्यानंतर ही शोध मोहीम थंड झाली आहे. चिपळूणसह परिसरात बांधकाम व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशींचा वापर केला जात असल्याचे पुढे येत आहे. मात्र, त्या दृष्टीने पोलिसांचा तपास ढिम्मच आहे.
रत्नागिरी येथे एक बांगलादेशी महिला पोलिस चौकशीत सापडली. या महिलेने सावर्डेमधील तरूणाशी विवाह केल्याचे पुढे आले आहे. यावरून घुसखोर बांगलादेशींनी कशाप्रकारे ठिकठिकाणी घुसखोरी केली आहे, हे स्पष्ट होत आहे. चिपळूण परिसरात मध्यंतरी एका बिल्डरकडे 30 ते 40 घुसखोर बांगला देशींची टीम समोर आली होती. मात्र, पोलिस कारवाईत पाच ते सहा जणांवर कारवाई करण्यात आली व गुन्हा नोंदविण्यात आला. त्यामुळे हे बांगला देशी नेमके गेले कुणीकडे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात ठिकठिकाणी इमारतींचे बांधकाम सुरू आहे. अनेक बिल्डर आणि बांधकाम व्यावसायिक बांगला देशींचा वापर इमारत बांधकामासाठी करतात. विशेष करून इमारतीचे सेंट्रिंग करण्याचे काम बांगला देशी करतात. त्यामुळे अनेक बिल्डरांकडून या टोळ्या मागविण्यात आल्या आहेत. चिपळूण परिसरात घुसखोर बांगला देशींची अशी टोळकी असल्याचे बोलले जात आहे. मात्र, पोलिस त्याकडे डोळेझाक करीत आहेत.
अनेक वर्षे हे घुसखोर ठिकठिकाणी काम करीत आहेत. त्यांनी या ठिकाणचे आधार कार्ड, पॅनकार्ड, रेशन कार्ड इतकेच काय मतदान कार्डदेखील मिळविले आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेच्या नियंत्रणाबाहेर हा प्रकार गेला आहे. असे असले तरी काही लोकांचा अजूनही बांगलादेशमधील नातेवाईकांशी संपर्क सुरू असल्याचे आधीच्या पकडलेल्या घुसखोर बांगलादेशींकडून स्पष्ट होत आहे. त्यामुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी हा गंभीर विषय आहे. परंतु त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसून स्वस्तात कामगार उपलब्ध होतात म्हणून चिपळुणात काही बिल्डरांनी घुसखोर बांगलादेशींच्या टोळ्या आपल्या जवळ ठेवल्या आहेत. सेंट्रिंग करणे, स्लॅब टाकणे, प्लॅस्टर, लादी अशा छोट्या-मोठ्या कामांसाठी स्वस्तात मजूर उपलब्ध होतो. म्हणून त्यांना पोसले जात आहे. काही बिल्डरांकडून अशा लोकांना भाडेतत्त्वावर सदनिका देण्यात आल्या आहेत. मात्र, त्या दृष्टीने पोलिसांचा तपास अपुरा पडत आहे.
जिल्ह्यात पोलिसांच्यावतीने घुसखोर बांगला देशी शोधमोहीम राबविण्यात येत आहे. रत्नागिरी येथे या प्रकरणी काही लोकांवर गुन्हे दाखल झाले. या शिवाय आधार कार्ड व अन्य कागदपत्रे देणार्या ग्रामसेवकावर कारवाई देखील करण्यात आली आहे. मात्र, ही कारवाई प्रातिनिधीक असून अनेक ठिकाणी असे घुसखोर बांगलादेशी कार्यरत आहेत. त्यांचा छडा लावणे गरजेचे आहे. पोलिसांनी आपल्या गुप्त यंत्रणेच्या माध्यमातून या घुसखोरांना शोधावे अशी मागणी होत आहे. चिपळूणसारख्या छोट्या शहरात देखील अनेक बिल्डरांकडे ही टोळकी काम करीत आहेत. या बाबत दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.