कुंडल : महामार्गावर पाय मोडलेल्या बैल आणि मालकीण जनाबाई. (छाया : तुकाराम धायगुडे)
Published on
:
21 Jan 2025, 12:37 am
Updated on
:
21 Jan 2025, 12:37 am
पलूस : बैल नाय वो लेकरूच हाय माजं. घरच्या माणसागत हाय ह्यो. पोटच्या पोरागत सांभाळतोय त्येला. पर आता पायच मोडला की वो माज्या पोराचा. काय करावं आता..जनाबाईचा हंबरडा गर्दीचा जीव कासावीस करत होता. तिच्या लाडक्या चब्याला मिठी मारून ती रडत होती. जीव लावलेल्या तिच्या बैलाचा पाय मोडला होता. कसंबसं तिला बाजूला सारून लोकांनी जेसीबी बोलावून बैलाला ट्रॉलीत ठेवलं आणि परत जनानं हंबरडा फोडला.
कुंडल फाट्यानजीक कराड- तासगाव महामार्गावर उसानं भरलेल्या गाड्या चालल्या होत्या. काय झालं समजलं नाही, पण महामार्गावर वेगाने येणार्या डंपरच्या आवाजानं बैलाचा तोल गेला आणि रस्त्यावर घसरून त्याचा पाय मोडला.बापू अण्णा बोरवे (रा. म्हसवड, ता. माण, जि. सातारा) बायकोसोबत दोन महिन्यांपासून तालुक्यातील एका कारखान्यावर ऊसतोडीसाठी आले आहेत.
ऊसतोडीसाठी येताना बोरवे यांनी मुकादमाकडून दोन लाखांची उचल घेतली. यात त्यांनी एक लाखांची बैल जोडी घेतली. रोजच्यासारखं जुना किर्लोस्करवाडी रस्त्यावरून सायंकाळी बैलगाडीत ऊस भरून ते कारखान्याकडं निघाले होते. बैलगाडीला कारखान्याकडं जाण्यासाठी विजापूर-गुहागर महामार्गाचा रस्ता ओलांडून पुढं जावं लागतं. बोरव्याची बायको जनाबाई बैलगाडीतनं खाली उतरली आणि महामार्गांवरील वाहनं थांबविण्याचा प्रयत्न करू लागली, पण सुसाट गर्दी काही थांबायचं नाव घेईना. तेवढ्यात कराडकडील बाजूनं एक डम्पर वेगानं आला आणि डंपरच्या आवाजानं घाबरलेल्या चब्या बैलाचा पाय घसरला. गाडीत उसाचा बोजा मोठा असल्यानं त्याचा पाठीमागचा डावा पायच मोडला. रस्ता रक्तानं भरला. जखमी चब्यावर तातडीनं पशुवैद्यकीय डॉक्टरांनी उपचार केले, पण पायाचं हाडच मोडल्यानं बैलाला उठता येईना.
बैलाचा पायच मोडला. लई नुकसान झालं. कारखान्यानं त्याच्यावर उपचार करावेत, चालायला आलं तर देवच पावला म्हणायचा. मुकादमानं एक बैल दिलाय. त्यामुळं त्याची आणखी उचल वाढली. ऊसतोड बंद आहे. कारखान्यानं काही मदत केली तर बरं होईल, नाहीतर हे कर्ज घेऊन कसं जगावं?
बापू अण्णा बोरवे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक जि.प.