बौद्ध समाजाचे राजकीय अस्तित्व धोक्यात; जागृती करणे आवश्यक:प्रा. विजय आठवले,‘ बौद्धांचे राजकीय अस्तित्व, आव्हाने’वर चिंतन

2 hours ago 1
‘लोकशाही व्यवस्थेत सत्तेपासून सातत्याने उपेक्षित राहिलेला समूह आपले अस्तित्व गमावून बसतो. अन्याय, अत्याचाराचा बळी ठरतो; म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्ता सर्वोच्च असून, शासनकर्ती जमात व्हा, असा संदेश आम्हाला दिला. मात्र दुर्दैवाने हा विचार आम्ही आत्मसात केला नाही. त्यामुळे बौद्ध समाज आज राजकीय अस्तित्व गमावून बसला आहे. अशा परिस्थितीत समाज संघटन व समाज जागृतीसाठी बुद्धिजीवी वर्गाने पुढाकार घेण्याची गरज आहे,’ असे मत प्रा. विजय आठवले यांनी व्यक्त केले. सम्राट अशोक प्रतिष्ठानतर्फे ‘बौद्ध समाजाचे राजकीय अस्तित्व आणि आव्हाने’, यावर आयोजित चिंतन सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भीम शक्ती सामाजिक संघटनेचे प्रदेश सरचिटणीस मधुसूदन भटकर होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. बाळकृष्ण खंडारे, प्रा. सुनील कांबळे, अनिल तायडे, अनिल गवई, प्रा. शैलेश इंगळे, विद्याधर मोहोड, संदेश गवई, बी.जी.इंगळे उपस्थित होते. प्रारंभी भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. दरम्यान या प्रसंगी समाजासाठी, चळवळीसाठी काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल गवई यांनी केले तर प्रा. शैलेश इंगळे यांनी आभार मानले. जनजागृतीसाठी मोहिम ः बौद्धांचे राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी संघटन व समाज जागृती महत्वाची आहे. याबाबत सम्राट अशोक प्रतिष्ठान व भीमशक्ती सामाजिक संघटना संयुक्तपणे समाज जागृतीचे काम करेल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या शिवाय प्रत्येक निवडणुकीत मतपत्रिकेचा वापर करावा, बौद्ध समाजाला क्रिमिलियर लागू होऊ नये, बौद्ध समाजासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ असावे , मागासवर्गीयांचा नोकरीतील बॅक लॉग भरून काढावा, यासाठी जन आंदोलन उभारण्याची घोषणाही करण्यात आली. ...हे लोकशाहीसाठी धोक्याचे ः बौद्ध समाजाचा राजकीय एकलकोंडेपणा समाजाला मारक ठरत असल्याचा सूर चिंतन सभेत उमटला. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात विधानसभेत विरोधी पक्ष नेता नाही, हे लोकशाहीसाठी धोक्याचे असल्याचे मत मधुसूदन भटकर,प्रा. डॉ. बाळकृष्ण खंडारे यांनी व्यक्त केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article