भाऊसाहेबांच्या शैक्षणिकसह सामाजिक क्रांतीमुळे विदर्भाचा विकास- डॉ. चव्हाण:भाऊसाहेब देशमुख यांच्या 125 व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यानमाला
2 hours ago
2
माणूस हा शिक्षणाशिवाय पुढे जाऊ शकत नाही. शेतकरी, शेतमजूर, बहुजन समाजातील मुले-मुली शिकल्या पाहिजेत. त्यांचा विकास झाला पाहिजे, यासाठी भाऊसाहेबांनी अथक प्रयत्न केले. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यामुळे विदर्भाचा विकास झाला. त्याचवेळी मराठवाडा मागास राहिल्याची खंत प्रा. डॉ. दिलीप चव्हाण यांनी व्यक्त केली. समाजातील तत्कालीन रूढी, परंपरा व अंधश्रद्धा यावर मात करून भाऊसाहेबांनी समाजाच्या उद्धाराचा मार्ग स्वीकारला. गोरगरीब विद्यार्थ्यांना राहण्याची सोय व्हावी म्हणून वसतिगृहाची स्थापना केली. दलितांसाठी अमरावतीचे अंबादेवीचे मंदिर खुले करून दिले. शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन भरवून शेतकऱ्यांना नवनवीन उपक्रम व तंत्रज्ञानाची माहिती या माध्यमातून करून दिली. असा विशाल दृष्टिकोन भाऊसाहेबांनी जोपासला. श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित स्थानिक जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालय दर्यापूर व रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत पानसरे महाविद्यालय, अर्धापूर जि. नांदेड येथे नुकताच डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२५ व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. या वेळी व्याख्यानाचे प्रमुख वक्ते म्हणून डॉ. चव्हाण बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पानसरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. आर. सय्यद होते. तर प्रमुख व्याख्याते म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. संतोष चव्हाण तसेच डॉ. रामचंद्र गायकवाड, डॉ. नारायण कडवे, डॉ. बेलसरे, जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल बोडखे, प्रा. डॉ. विजय येलकर, प्रा. डॉ. विनोद कोकणे, प्रा. डॉ. राजेश बुरंगे व प्रा. डॉ. राजेश उमाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. ए. आर. सय्यद यांनी भाऊसाहेबांसारखे समाजसुधारक मराठवाड्यात जन्माला आले असते तर हा प्रांत उच्च कोटीला पोहोचला असता, असे मत व्यक्त केले. या व्याख्यानाचे प्रास्ताविक डॉ. रामचंद्र गायकवाड यांनी केले. तर श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या व महाविद्यालयाच्या विकासाचा तसेच भाऊसाहेबांच्या कार्याचा आढावा प्राचार्य डॉ. अतुल बोडखे यांनी घेतला. याप्रसंगी राज्यशास्त्र विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेले भारतीय संविधान या भित्तिपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. याचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. बेलसरे होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. सय्यद व प्रमुख वक्ते डॉ. दिलीप चव्हाण यांचा भाऊसाहेबांची प्रतिमा देऊन प्राचार्य डॉ. अतुल बोडखे यांनी सत्कार केला. या व्याख्यानाची सुरुवात डॉ. राजेश उमाळे यांनी गायलेल्या भाऊसाहेबांच्या गौरव गीताने झाली. सूत्रसंचालन डॉ. नारायण शिवशक्ती यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. विनोद कोकणे यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वत:च्या कुटुंबाचीही पर्वा न करणारे भाऊसाहेब खरे लोकनेते समाज व लोकांसाठी आयुष्यभर झटणारे खरे लोकनेते होते. त्यांनी अमरावतीसह संपूर्ण विदर्भात शिक्षणाचा पाया घातला. वेळप्रसंगी स्वत:च्या कुटुंबाचीही पर्वा केली नाही. समाजासाठी त्यांनी वाहून घेतले. शेती व शिक्षणाचे त्यांच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्व होते. कारण, यातूनच समाजाचा खरा विकास होतो, असे त्यांचे ठाम मत होते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करून तसेच देशाचे पहिले कृषिमंत्री म्हणून भाऊसाहेबांनी देशवासीयांसाठी मोठे कार्य करून ठेवल्याचे सूरही या व्याख्यानमालेत उमटले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)