एन. कृष्णय्या शेट्टीPudhari File Photo
Published on
:
07 Feb 2025, 1:24 am
Updated on
:
07 Feb 2025, 1:24 am
बंगळूर : माजी मंत्री आणि भाजप नेते मालूर एन. कृष्णय्या शेट्टी व त्यांचे बंधू फसवणूक प्रकरणात दोषी ठरले आहेत. सीबीआय चौकशीत त्यांचे आरोप सिद्ध झाले असून, लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाकडून लवकरच शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
आयटीआय, एचएएल, बीईएमएलसह काही कंपन्यांमध्ये सेवेत असणार्या कर्मचार्यांना सवलती दरात भूखंड आणि घर बांधून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या नावांवर बँकेतून कर्ज काढून दिले होते. याद्वारे त्यांनी अनेकांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता.
1993 च्या काळात शेट्टी यांनी आपल्या मालकीच्या बालाजी कृपा कंपनीमार्फत केएसआरटीसी, बीएसएनएलमधील 181 कर्मचार्यांना घर बांधून देण्याचे सांगून 7.17 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यासाठी बोगस कागदपत्रे सादर करण्यात आली होती. या प्रकरणात 3.53 कोटी रुपयांची परतफेड केली नव्हती. जागृती पथकाचे तत्कालीन प्रमुख आर. डी. नायडू यांनी याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. सीबीआयने बँक खाती, कर्ज वितरणाबाबत तपास केला होता. यामध्ये कृष्णय्या शेट्टी, श्रीनिवास मुनीराजू आणि रेड्डी एमटीबी यांचा सहभाग असल्याचे दिसून आले होते. त्यानुसार सीबीआयने आरोपपत्र दाखल केले होते. शेट्टी यांच्याविरुद्धच्या प्रकरणाची सुनावणी लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयात करण्यात आली. न्यायमूर्ती संतोष गजानन भट यांनी सुनावणी पूर्ण करून शिक्षा सुनावली.
शेट्टी हे भाजपचे माजी आमदार आहेत. कर्नाटकात भाजपची सत्ता असताना ते धर्मादाय खात्याचे मंत्री होते. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचे ते निकटवर्तीय होते. त्यांनी काही काळ भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2017 मध्ये ते पुन्हा भाजपमध्ये आले. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना बंगळुरातील गांधीनगरातून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. पण, काही कारणास्तव त्यांची उमेदवारी काढून घेऊन सप्तगिरी गौडांना देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या शेट्टींनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. मात्र, त्यांना केवळ 6,781 मते मिळाली होती. त्यानंतर ते राजकारणापासून अलिप्त होते.