Published on
:
26 Nov 2024, 6:52 am
Updated on
:
26 Nov 2024, 6:52 am
पालघर : पालघर जिल्ह्यात महायुतीने सहापैकी पाच विधानसभेच्या जागा जिंकत किमया साधली आहे. मात्र विजयाच्या जवळपास असलेल्या डहाणू विधानसभेमध्ये भाजपचा निसटता पराभव झाला. माकपचे विनोद निकोले यांनी भाजपच्या विनोद मेढा यांना चितपट करत दुसऱ्यांदा आमदार होण्याचा मान पटकावला. भाजपच्या जिल्हाध्यक्षांची ही कर्मभूमी असताना भाजप येथे सपाटून आपटल्याने आता वेगवेगळ्या चर्चा येथील भाजपच्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत.
डहाणू विधानसभेच्या अपयशानंतर भाजपाची एक फळी जिल्हा नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत असून त्यांच्यावर समाजमाध्यमांमधून टिकाखे डागताना दिसून आले. डहाणू विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेढा यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. या सभेतील गर्दी पाहून भाजपच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. फडणवीस यांच्यासह गुजरात व केंद्रशासित प्रदेशातील दिग्गज नेते डहाणूमध्ये काही दिवस आपले बस्तान बसवून होते. येथे मोठ्या प्रमाणात महालक्ष्मी दर्शन करवले गेले. त्यानंतरही भाजपचे उमेदवार मेढा यांना मतदारांचा आशीर्वाद न मिळाल्यामुळे भाजपच्या गोटात वेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.
डहाणूतील भाजपचे जिल्हाध्यक्ष व त्यांचे जवळचे काही सहकारी भाजपच्या पराभवानंतर समाज माध्यमांवर टीकेचे धनी होत आहेत. निवडणूक काळात जिल्हाध्यक्ष यांच्या कार्यालयातून योग्य सुविधा पुरवल्या नसल्याने या निवडणुकीत भाजप डहाणू विधानसभेत कमी पडल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या एका महिला सदस्यांनी केला आहे. तर समाजमाध्यमांवर विजयाचे पोस्टर टाकल्यानंतर या पोस्टरवर भाजपा विरुद्ध भाजप अशी शाब्दिक चकमक दिसून आली. त्यामुळे डहाणूच्या पराभवानंतर भाजपामध्ये खल निर्माण झाली असून जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर सर्वजण समाज माध्यमांद्वारे प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. काम न केलेल्या पदाधिकाऱ्यांना पक्षश्रेष्ठींनी बाहेरचा रस्ता दाखवावा अशा मागण्यांचे संदेशही समाज माध्यमांच्या चर्चेचे विषय बनले आहेत.
निवडणूक निकालाच्या दिवशी विनोद मेढा व विनोद निकोले यांच्या मतांमध्ये एक-दोन फेरी अखेर मागेपुढे मताधिक्य होत होते. दोन्ही उमेदवारांच्या चिंता वाढल्या होत्या. अखेरचा दोन फेऱ्यांमध्ये विनोद निकोल यांना ५००० च्या जवळपासचे मताधिक्य मिळाले व विनोद निकोले विजयी झाले. जिल्हाभरात महायुतीच्या पाच जागा आल्या व डहाणूचा गड मात्र भाजप राखू न शकल्याने जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काम केले असते तर हा गड राखता आला असता अशा प्रतिक्रिया भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते चर्चा करताना दिसून आले.
भाजपचे डहाणूमधील पराभूत उमेदवार विनोद मेढा हे संघर्षमय काळात भाजपा सोबत निष्ठावान होते व आताही आहेत. त्यांना पक्षाने योग्य वेळी तिकीट देऊन विजयाची संधी दिली होती. मात्र काही गद्दारांमुळे मेढा यांचा पराभव झाला असला तरी पक्ष त्यांचे पुनर्वसन करेल अशी सहानुभूती मेढा यांच्यप्प्रती दाखवत गद्दाराना त्यांची जागा दाखवून देईल असा राग समाजमाध्यामांद्वारे संदेशातून प्रकट केला. भाजपच्या एका फळीमधून प्रकट होत असलेल्या रागाची शहानिशा पक्षश्रेष्ठी करतील का अशी चर्चा सध्या राजकीय चर्चेचा विषय बनला आहे.