विद्यार्थिनीवर फेकले प्रेमाचे जाळे; शिक्षकाला चोप!Pudhari
Published on
:
26 Nov 2024, 9:43 am
Updated on
:
26 Nov 2024, 9:43 am
Akole News: अकोले तालुक्यातील महाविद्यालयात शिकणार्या विद्यार्थिनीवर प्रेमाचे जाळे फेकून तिच्या पतीला शिवीगाळ व मारहाण करणार्या ‘त्या’ प्राध्यापकाला हिंदूत्व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला. यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर पोलीस प्रशासनाने ‘त्या’ शिक्षकाला ताब्यात घेवून गुन्हा दाखल केला. तसेच संस्थेच्या पदाधिकार्यांनी शिक्षकाचे निलंबन करण्याची ग्वाही दिल्यानंतर हा तणाव निवाळल्याचे दिसले.
या घटनेची माहिती अशी की, एका नोकरदार व्यक्तीची पत्नी ही महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तीचे पाच महिन्यांपासून मोबाईलव्दारे ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. दरम्यान, एका प्राध्यापकाने तिचे ऑनलाईन क्लास घेताना तिच्याशी ओळख बनवली. यातून प्रेमसंबंध निर्माण केले.
दि.3 नोव्हेंबर 2024 रोजी संबंधित विवाहितेच्या पतीला या प्रकाराबाबत समजल्याने त्याने संबंधित प्राध्यापकास तुम्ही माझ्या पत्नीशी चॅटिंग का करता, असा जाब विचारला. त्यावेळी प्राध्यापकाने ‘त्या’ पतीच्या शर्टाची कॉलर धरून मारहाण करत तुला जिवे ठार मारुन टाकतो, अशी धमकी दिली.
या घटनेची माहिती समजताच हिंदूत्ववादी संघटना, सर्वपक्षीय कार्यकर्ते ‘त्या’ महाविद्यालयात दाखल झाले. त्यांनी ‘त्या’ प्राध्यापकाला चांगला चोप दिला. तसेच त्याला निलंबित करण्यासाठी मोर्चा काढला. महात्मा फुले चौकात रास्ता रोको करत घटनेचा निषेध व्यक्त केला. त्यानंतर अकोले पोलीस ठाण्यावर मोर्चा नेण्यात येऊन कडक कारवाईची मागणी केली.
यावेळी भाजपाचे सिताराम भांगरे, मनसेचे तालुकाध्यक्ष दत्ता नवले, राष्ट्रवादीचे राहुल शेटे, संदीप शेणकर, बजरंग दलाचे भाऊसाहेब चव्हाण, राहुल ढोक, सोपान गाडे, राहुल माने, गणेश धुमाळ, आबा मंडलिक, भारत वाकचौरेसह तरुणांनी ठिय्या मांडला.
संबंधित प्राध्यापक हा जाणीवपूर्वक हिंदू मुलीं सोबत अशाप्रकारे विकृत मनोवृत्तीने वारंवार ही प्रकरणे घडवत आहे. त्याच्या विरोधात पोलीस प्रशासनाने अतिशय कडक कार्यवाही करावी, अन्यथा पुन्हा रस्त्यावर उतरू, असा इशारा विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे भारत वाकचौरे व राहुल ढोक यांनी पोलीस प्रशासनाला दिला.