IND vs AUS Test Series : भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेपूर्वी माजी फलंदाज सचिन तेंडुलकरच्या एका पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. (Image source- X)
Published on
:
17 Nov 2024, 7:41 am
Updated on
:
17 Nov 2024, 7:41 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेट विश्वातील बहुचर्चित बॉर्डर-गावस्कर मालिका लवकरच सुरु होणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया होणार्या या कसोटी मालिकेपूर्वी भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने एक पोस्ट करत सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.
सचिन आपल्या पोस्टमधून काय विचारतोय?
सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म X वर केलेल्या पोस्टमध्ये सचिन तेंडुलकर याने एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो तीन मोठ्या झाडांसमोर फलंदाजी करताना दिसत आहे. तिन्ही झाडे अशा प्रकारे मांडलेली आहेत की, क्रिकेटमधील विकेट्ससारखीच दिसतात. या फोटोला सचिनने कॅप्शन देत चाहत्यांना विचारले आहे की, कोणत्या अंपायरमुळे स्टंप इतका मोठा वाटला?
पंच स्टीव्ह बकनर यांनी सचिन तेंडुलकरबाबत घेतलेले बहतुांश निर्णय हे चुकीचे ठरल्याचे नंतर स्पष्ट झाले. Pudhari
पंच स्टीव्ह बकनर होतायत ट्रोल
सचिन तेंडुलकरच्या या प्रश्नाच्या उत्तरात चाहत्यांनी सोशल मीडियावर अनेक उत्तरे दिली आहेत. अनेकांनी असा अंदाज वर्तवला आहे की, ही पोस्ट माजी पंच स्टीव्ह बकनर यांच्यासाठीच आहे. कारण 1990 आणि 2000 च्या दशकात बकनर यांनी अनेक सामन्यात सचिन तेंडुलकरला चुकीचा बाद ठरवलेले निर्णय वादाच्या भोवर्यात सापडले होते. सचिनची पोस्ट म्हणजे बकनरने घेतलेल्या वादग्रस्त निर्णयांचा स्पष्ट संदर्भ आहे, असे मत चाहते व्यक्त करत आहेत. सध्याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी सचिनच्या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.त्यांची पोस्ट व्हायरल झाली असून, यावर चाहते जोरदार कमेंट करत आहेत. माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाणनेही या पोस्टवर कमेंट करत लिहिले की, डीआरएसच्या काळात स्टीव्ह बकनर मैदानापासून कित्येक मैल दूर पळून गेले असते.
२००३ आणि २००५ मध्ये काय घडलं होतं?
2003 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील गाबा, ब्रिस्बेन येथे कसोटी सामना झाला. या सामन्यात जेसन गिलेस्पीच्या गोलंदाजीवर तेंडुलकरला लेग बिफोर विकेट (LBW) देण्यात आली. टीव्ही रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसून आले की चेंडू स्टंपवरून गेला असेल. चेंडू उंच असल्याचे स्पष्टपणे दिसून आले आणि सचिनला बाद घोषित करण्याच्या बकनर यांच्या निर्णयाने वादाला तोंड फुटले. सचिनच्या चाहत्यांसह आणि माजी क्रिकेटपटूंनी बनकर यांच्या निर्णयावर जोरदार टीका केली होती. यानंतर 2005 मध्ये कोलकात्याच्या ईडन गार्डन्स येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान घडली. येथे अब्दुल रज्जाकच्या चेंडूवर सचिन झेलबाद झाला. तेव्हा चेंडू आणि सचिनच्या बॅटमध्ये संपर्क नव्हता. खेळपट्टीनंतर चेंडू तेंडुलकरपासून दूर गेला आणि रिप्लेने पुष्टी केली की एकही धार लागली नाही. त्यावेळी चाहत्यांमध्ये बकनरबाबत प्रचंड नाराजी होती. याशिवाय 2007-08 मध्ये भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बकनर यांचे अनेक निर्णय हे वादाच्या भोवर्यात सापडले होते.
२००८ मध्ये सिडनी कसोटीतील निर्णयही ठरला होता वादगस्त
ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंग 2008 मध्ये सिडनी कसोटीत पहिल्या डावात तिसऱ्या क्रमांकावर आला. या सामन्यात यष्टिरक्षक एमएस धोनीने पाँटिंगला लेग साइडवर झेलबाद केले होते. मात्र पंच स्टीव्ह बकनर यांनी पाँटिग बाद नसल्याचे सांगितले. यानंतर पाँटिंगने मायकेल हसीच्या साथीने ९२ धावांची भागीदारी केली.याच सामन्यात इशांत शर्माने सायमंड्सला धोनीकरवी झेलबाद केले. मात्र, बकनर हे सायमंड्सला बाद न देण्यावर ठाम राहिले. तसेच या कसोटीदरम्यान सौरव गांगुलीबाबतही बकनर यांनी बाद ठरवेला निर्णयही वादाच्या भोवर्यात सापडला होता. क्लार्कच्या गोलंदाजाीवर चेंडू सौरव गांगुलीच्या हाताला लागल्याचे स्पष्ट दिसत होते. तरीही ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पॉन्टिंगने मार्क बेन्सन यांनी केलेल्या अपीलवर बकनर यांनी गांगुलीला बाद ठरवले. या निर्णयांमुळे बकनर यांच्यावर त्यावेळी टीकेची झोड उठली होती.
बकनर सर्वोत्कृष्ट पंचांपैकी एक पण..
बकनर यांनी १२८ कसोटी सामने आणि सलग पाच क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यात पंच म्हणून कामगिरी नोंदवली. ते सर्वोत्कृष्ट पंचांपैकी एक म्हणून ओळखले जातात;पण त्यांनी सचिन तेंडुलकरविरुद्धच्या दिलेले निर्णय हे नेहमीच वादाच्या भोवर्यात सापडले. काही काळापूर्वी बकनरयांनी आपल्या निर्णयातील चुका मान्य केल्या होत्या, याबाबत खंत व्यक्त केली होती. त्या मोठ्या चुका असल्याचेही त्यांनी मान्य केले होते.