राज्यातील यंदाची निवडणूक खूपच अटीतटीची होत आहे. या निवडणूकीत काटे की टक्कर होणार आहे. राज्यात पूर्वी चार प्रमुख पक्ष असल्याने चौरंगी निवडणूका व्हायच्या त्यानंतर युती जन्माला आल्याने दुरंगी सामने होऊ लागले. परंतू आता दोन पक्ष फुटल्याने सहा पक्ष झाले आहेत. त्यामुळे गद्दार आणि खुद्दार यांचा सामना रंगणार आहे.
महाराष्ट्रात पहाटेच्या शपथविधीनंतर सत्तानाट्य प्रचंड गाजले होते. अजित पवार यांच्या संगतीने देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेले सरकार अवघे काही तास टिकले. त्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले. शिवसेना आणि भाजपात मोठी दरी निर्माण झाली. त्यानंतर दोन वर्षांनी आणखीन मोठा भूकंप आला. शिवसेनेत उभी फूट पडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा लागला. एकनाथ शिंदे आपल्या 40 आमदारांना घेऊन भाजपाला मिळाले त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर काही महिन्यांनी राष्ट्रवादी फोडण्यात आली. अजितदादांनी काकांची साथ सोडली आणि ते उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पन्नास खोके आणि गद्दार या शब्दांचे प्राबल्य वाढले. वाईमध्ये आज शरद पवार यांची सभा झाली. या प्रचार सभेत शरद पवारांना व्यासपीठावर एक चिट्टी आली. पवारांनी ही चिठ्ठी वाचून दाखवली. त्या गद्दारांचे करायचे काय ? असा सवाल विचारण्यात आला होता. शरद पवार यांनी उत्तर दिले गद्दारांना पाडा,पाडा, आणि पाडा….त्यांनंतर उपस्थितांनी एकच कल्लोळ केला आणि टाळ्यांचा कडकडाट केला.
Published on: Nov 16, 2024 04:30 PM