Published on
:
15 Nov 2024, 10:24 am
Updated on
:
15 Nov 2024, 10:24 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय अर्थव्यवस्था २०२४ मध्ये मागील वर्षीच्या ७.७ टक्क्यांच्या तुलनेत ७.२ टक्के वाढीसह मजबूत गतीने वाढत राहील, असे मूडीज रेटिंग्ज (Moody’s Ratings) या जागतिक पतनिर्धारण संस्थेने १५ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या ग्लोबल मॅक्रो आउटलूकमध्ये म्हटले आहे.
Indian economy : अर्थव्यवस्थेची स्थिर गती कायम राहील
“मजबूत वाढ आणि मध्यम महागाईवाढ यांच्या संयोगाने भारतीय अर्थव्यवस्था एका सकारात्मक पातळीवर आहे. आम्ही २०२४ (calendar year) साठी ७.२ टक्के वाढीचा अंदाज वर्तवला आहे. त्यानंतर २०२५ मध्ये ६.६ टक्के आणि २०२६ मध्ये ६.५ टक्के वाढ राहील,” असे मूडीज रेटिंग्जने नमूद केले आहे. जुलै-सप्टेंबर तिमाहीतही अर्थव्यवस्थेची स्थिर गती कायम राहील, असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
२०२४ मधील एप्रिल-जून तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ६.७ टक्के एवढा होता. "उच्च-वारंवारता निर्देशक हे उत्पादन आणि सेवा पीएमआयचा विस्तार, मजबूत क्रेडिट वाढ आणि ग्राहक आशावादासह तिसऱ्या तिमाहीत स्थिर आर्थिक गतीचे संकेत देतात," असे मूडीज रेटिंग्जने म्हटले आहे.
"सणासुदीच्या काळात वाढलेल्या खर्चामुळे आणि कृषी उत्पादनातील सुधारणेमुळे ग्रामीण भागातून मागणीत सतत वाढ झाली आहे. यामुळे देशांतर्गत वापर वाढण्याची शक्यता आहे." असे पुढे अधोरेखित करण्यात आले आहे.
अन्नधान्यांच्या किमती कमी होतील
येत्या काही महिन्यांत महागाई कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. "नजीकच्या काळातील चढ-उतार असूनही, येत्या काही महिन्यांत महागाई दर आरबीआयच्या उद्दिष्टानुसार कमी झाली पाहिजे. कारण अधिक व्यापलेले पीक क्षेत्र आणि अन्नधान्याचा पुरेसा बफर साठा आदींमुळे अन्नधान्यांच्या किमती कमी होतील," असे अहवालात नमूद केले आहे.
India’s inflation : महागाई १४ महिन्यांच्या उच्चांकावर
देशातील महागाई दर ऑक्टोबरमध्ये ६.२ टक्क्यांच्या १४ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला. ऑक्टोबरमधील महागाईने आरबीआयची २-६ टक्के दरम्यानची मर्यादा पार केली. यामुळे आरबीआयकडून डिसेंबरमध्ये व्याजदरकपातीची शक्यता कमी झाली आहे.