Published on
:
16 Nov 2024, 5:04 am
Updated on
:
16 Nov 2024, 5:04 am
मुंबई : Maharashtra Assembly Polls | पोलीस शिपाई गणेश अशोक शिंदे यांनी २३१-आष्टी विधानसभा मतदारसंघ (जि. बीड) या मतदार संघासाठी टपाली मतपत्रिकेव्दारे मत नोंदवल्यानंतर त्यांच्या भ्रमणध्वनीमध्ये मतपत्रिकेचा फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केला. टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर वायरल केल्यामुळे कायदेशीर आदेशाची अवज्ञा केली तसेच मतदानाची गोपनियता भंग केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी दिली.
मलबार हिल मतदारसंघात विल्सन महाविद्यालय, नेताजी सुभाषचंद्र रोड, गिरगाव चौपाटी, चर्नीरोड मुंबई येथे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी टपाली मतदानासाठी फॅसिलिटेशन सेंटर तयार केले आहे. या सेंटरमधील मतदान केंद्र क्र.३ वर ही घटना घडली. सर्व मतदारांना मतदान केंद्रावर मोबाईल वापरास बंदीबाबत तसेच मतदारांनी मतदान करताना गोपनियता बाळगून मतदान करावे व मतदान पूर्ण केल्यानंतर, बॅलेट मतपत्रिका व १३ ए फॉर्म हा त्यासोबतच्या लिफाफ्यात भरुन हा लिफाफा बंद अवस्थेत मतदान कक्षात ठेवलेल्या मतदान पेटीत टाकण्याबाबत सुचित केले होते, अशी माहिती मतदान केंद्राध्यक्ष प्रसन्न मधुसुदन तांबे यांनी दिली.