महाराष्ट्र काँग्रेसने ‘भ्रष्टयुती’ विरोधात कॉमिक-शैलीतील जाहिरात मोहीम राबवली होती. ही जाहिरात एवढी व्हायरल झाली की अनेक ठिकाणी या जाहिरातींचे पोस्टर लावण्यात आले होते. राज्यातील अनेक ठिकाणी बॅनरही लावण्यात आले होते. मुंबई,पुणे, नागपूर आणि नाशिकमध्ये या जाहिरातींचे पोस्टर्स लावण्यात आले होते.
कॉमिक शैलीतील या पोस्टर्समध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा प्रकल्पातील कथित भ्रष्टाचार, कायदा व सुव्यवस्थेच्या उडालेल्या चिंधड्या, महिलांच्या सुरक्षिततेवरील चिंतांचा मुद्दा, 90 टक्के वचनांची अपूर्तता, महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेले साडे सात लाख कोटींचे प्रकल्प, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि बेरोजगारीसारख्या गंभीर समस्यांचा उल्लेख करण्यात आलेला होता. मतदानाच्या एक दिवसापूर्वीच हे पोस्टर व्हायरल झाल्याने महायुतीसाठी हा धक्का मानला जात आहे.