Published on
:
22 Nov 2024, 1:51 am
Updated on
:
22 Nov 2024, 1:51 am
कराड : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील 3 लाख 15 हजार 420 मतदारांपैकी 2 लाख 40 हजार 743 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून कराड दक्षिणेत 76.32 टक्के मतदान झाले आहे. मतदानानंतर आता शनिवारी मतमोजणी होणार असून सकाळी 8 वाजता सर्वप्रथम टपाली मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. त्यानंतर अर्ध्या तासाने मतदान यंत्रातील मतांची मोजणी सुरू होणार असून सुमारे 17 ते 18 राऊंडमध्ये मतमोजणी पूर्ण होणार आहे. त्यामुळेच दुपारी 1 वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील 342 मतदान केंद्रावर समावेश असणार्या एकूण पुरूष मतदारांपैकी 1 लाख 23 हजार 896 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर महिला मतदारांपैकी 1 लाख 16 हजार 835 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. याशिवाय इतर 12 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूण मतदानाच्या 76.32 टक्के मतदान झाले आहे. दरम्यान, शनिवारी शंभूतिर्थ परिसरातील शासकीय गोडावूनमध्ये मतमोजणी होणार आहे.
मतमोजणीसाठी 33 टेबल असून यापैकी पहिल्या दहा टेबलांवर टपाली मतांची मोजणी होणार आहे. तर 11 ते 30 या 20 टेबलांवर मतदान यंत्रातील मतांची मोजणी होणार असून 17 ते 18 राऊंडमध्ये ही मतमोजणी पूर्ण होणार आहे. याशिवाय त्यानंतरच्या तीन टेबलांवर सैनिकांच्या मतांची मोजणी होणार आहे. सकाळी 8 वाजता प्रथम टपाली मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. त्यानंतर 8.30 च्या सुमारास मतदान यंत्रातील मतांची मोजणी सुरू होणार आहे. मतमोजणीसाठी सुमारे 300 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली असून दुपारी 1 वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.
कडेकोट बंदोबस्त अन् सीसीटीव्हीची नजर...
शंभूतीर्थ परिसरातील गोडावूनमध्ये मतमोजणीची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. मतदान यंत्रे ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूम परिसरात कडेकोट सशस्त्र बंदोबस्त तैनात असून या परिसरात कोणालाही सोडले जात नाही. याशिवाय संपूर्ण परिसरावर सीसीटीव्ही कॅमेर्यांद्वारे करडी नजर ठेवली जात आहे.