Published on
:
17 Nov 2024, 9:46 am
Updated on
:
17 Nov 2024, 9:46 am
जालना, पुढारी वृत्तसेवाः राज्यात होऊ घातलेली निवडणूक ही दोन विचारांची लढाई आहे. या लढाईत धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन करण्यासाठी काही उमेदवार निवडणूक लढवत आहेत. अशा लोकांपासून सावध राहून इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कैलास गोरंट्याल यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी जाहीर सभेत बोलतांना केले.
जालना विधानसभा मतदार संघाचे इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. कैलास गोरंट्याल यांच्या प्रचारार्थ शहरातील गांधी चमन येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख हे होते. जालना लोकसभेचे पक्षाचे प्रभारी तथा माजी मंत्री डॉ.पी.सी. शर्मा, उमेदवार आ. कैलास गोरंट्याल, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, युवा नेते अक्षय गोरंट्याल, विजय चौधरी, आपचे जिल्हाध्यक्ष संजोग हिवाळे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष किशोर मघाडे, राकाँचे शहर जिल्हाध्यक्ष नंदकिशोर जांगडे, बदर चाऊस, शिव- सेनेचे शहर जिल्हाध्यक्ष बाला परदेशी, महावीर ढक्का, अब्दुल रफीक, राजेंद्र जाधव आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना पायलट म्हणाले की, केंद्रातील सत्ता आणि पैशांच्या जोरावर भाजपाने मागील अडीच वर्षापूर्वी फोडा फाडीचे राजकारण करून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडले होते. त्यामुळे महाराष्ट्रात होत असलेल्या या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. केंद्रात दहा वर्ष भाजपा सत्तेत असून या सत्ता काळात शेतकरी, बेरोजगार यांचे प्रश्न सोडविण्यासाठीआणि महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारने काय केले?
जालना नगरीला नजर लावण्याचे काम गोरंट्याल
जालना विधानसभा मतदार संघाचे मविआचे उमेदवार आ. कैलास गोरंट्याल यांनी यावेळी बोलताना जालना ही उद्योग नगरी असून या नगरीला नजर लावण्याचे काम प्रतिस्पर्धी उमेदवार करीत असल्याचा आरोप केला. शहरात चांगले उद्योग यावेत असा प्रयत्न आपण सातत्याने केला असेही ते म्हणाले.
गोरंट्याल यांना विजयी करा - देशमुख
जालना शहर व मतदार संघात मागील काही दिवसांपासून मोठी गुंडागर्दी वाढली आहे. ही गुंडागर्दी संपुष्टात आणण्यासाठी मविआचे अधिकृत उमेदवार आ. कैलास गोरंट्याल यांना विजयी करा, असे आवाहन जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी येथे बोलतांना केले.