बॉलिवूडमधील विलासी जीवन सोडून ममता कुलकर्णी आता संन्यास मार्गाला लागली आहे. ममता कुलकर्णी आता महामंडलेश्वर झाली आहे. एकेकाळी ममता कुलकर्णी बॉलिवूडमधील मोठं नाव होतं. त्याशिवाय ती अनेक कारणाने वादातही अडकली होती. त्यामुळे तिला देश सोडूनही जावं लागलं होतं. मागच्याच वर्षी ती भारतात परतली. तब्बल 25 वर्षानतंर ती भारतात आली. आता तिने संन्यास घेतला. साध्वी बनली. महामंडलेश्वर बनली आहे. त्यामुळे ममता कुलकर्णी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ममता संन्यास मार्गाकडे का पोहोचली? तिच्या आयुष्यात असं काय घडलं? याचा शोध अनेक पत्रकार घेत आहेत. तीही विविध ठिकाणी मुलाखती देऊन आपली भूमिका स्पष्ट करताना दिसत आहे.
ममता कुलकर्णीने नुकतीच न्यूज 9 शी संवाद साधला. यावेळी तिने आपण बॉलिवूड सोडल्याचं स्पष्ट केलं. आता बॉलिवूडमधून कोणत्याही प्रकारची ऑफर आली तर मी ती स्वीकारणार नाही. आता मला जर कोणी एखादा प्रोजेक्ट दिला तर माझ्यासाठी तो निव्वळ वेळेचा अपव्यय ठरेल, असं ममताने स्पष्ट केलं. तसेच तिने तिच्या अध्यात्माच्या प्रवासावरही भाष्य केलं.
बुद्धासोबत तुलना
माझ्यावर सिनेमा काढण्यासाठी नेटफिलिक्सने दोन वर्षापूर्वीच ऑफर दिली होती. अनेक निर्मातेही माझ्या आयुष्यावर फिल्म बनवण्यास उत्सुक होते. कारण तिने अनेक मुलाखतीत तिचा जीवन प्रवास बुद्धाच्या जीवन प्रवासासारखा असल्याचं म्हटलंय. बुद्धाने महाल सोडला. तसंच मीही ऐश्वर्य सोडून या मार्गावर आल्याचं तिने म्हटलंय. पण तिने स्वत:ची बुद्धाशी केलेली तुलना अनेकांना आवडली नाही. तू स्वत:ची तुलना तथागत बुद्धाशी कशी करू शकते? असा सवाल लोकांनी केला होता.
48 सिनेमात काम
बुद्धाशी तुलना केल्याने लोक नाराज झाले होते. त्यावर तिने पुन्हा एकदा आपलं मत मांडलं आहे. बुद्ध आपल्या वडिलांचा महाल सोडून सत्याच्या शोधात निघाले होते. माझ्या मनातही असाच विचार चमकला. मीही बॉलिवूडमध्ये होते. ऐषोआरामी जीवन जगत होते. मी 48 सिनेमात काम केलं. मी अनेक कॉन्सर्ट केले. वर्ल्ड टूर केली. माझ्याकडे चार पासपोर्ट आहेत. दोन कार आहेत. आणि 10 नोकर आहेत. हे सर्व सोडून मी संन्यास मार्गाला लागले आहे, असं ती म्हणाली. माझ्याबाबत जे घडायचं ते सर्व लवकर घडलं आहे, असंही तिने स्पष्ट केलं.
ममताच्या नावे मंदिर
मी तामिळ सिनेमात पहिल्यांदा काम केलं. या सिनेमाने रेकॉर्ड बनवलं. लोकांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. इतकं की त्यांनी माझ्या नावाचे टॅटू बनवले. माझा दुसरा सिनेमा तेलूगू होता. या सिनेमानंतर लोकांमध्ये माझी क्रेझ वाढली. लोकांनी माझं मंदिर बनवलं. त्यानंतर मी बॉलिवूडमध्ये आले आणि चांगले सिनेमे देण्याचा प्रयत्न केला, असंही तिने सांगितलं.