पुण्यात महायुतीचे वर्चस्व; महाविकासला एकच जागाPudhari
Published on
:
25 Nov 2024, 3:49 am
Updated on
:
25 Nov 2024, 3:49 am
Pune News: इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि मराठा समाजाचा कल महायुतीकडे गेला आणि महायुतीच्या विजयाचे ते एक प्रमुख कारण ठरले, असे एकत्रितपणे महायुतीला मतदान झाल्याचे स्पष्ट झाले. ‘सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज’ (सीएसडीएस) या संस्थेने लोकनीती कार्यक्रमाद्वारे केलेल्या सर्वेक्षणामध्ये ही बाब समोर आली आहे.
विद्यमान सरकारचे मूल्यांकन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि हिंदू ऐक्याचे आवाहन या प्रमुख तीन मुद्द्यांचा राज्यातील विधानसभा निवडणुकीवर प्रभाव दिसून आला. केंद्र आणि राज्यात एकाच भूमिकेचे सरकार यावे, यासाठी मतदारांची अनुकूलता दिसली. हिंदू एकता हा प्रमुख विचार या निवडणुकीत प्रकर्षाने पुढे आला. तसेच यामध्ये तुलनेने युतीला दलितांचा पाठिंबा कमी, तर मुस्लिमांचा अत्यल्प असल्याचे दिसले. हे सर्वेक्षण निवडणुकीच्या आधीच्या आठवड्यात म्हणजे 13 ते 18 नोव्हेंबरदरम्यान करण्यात आले.
विधानसभेच्या निवडणुकीत राज्य आणि केंद्रीय पातळीवरील नेत्यांची भूमिका निर्णायक ठरली. त्यातही महायुतीच्या कामगिरीत पंतप्रधान मोदी यांच्या भूमिकेचा मतदारांवर चांगला प्रभाव दिसून आला. महायुती आणि महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा दिला नाही; कारण दोन्ही आघाड्यांतील मजबुरी वेगवेगळी दिसली.
बहुतांश लोकांची डबल इंजिन सरकारला पसंती असल्याचे दिसून आले. महायुतीला मध्यमवर्गीय आणि गरिबांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला. यातूनच भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला; शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षांच्या विजयाला हातभारदेखील लावला. निवडणुकीत पुरुषांच्या तुलनेत महिलांनी जास्त मतदान केल्याचे स्पष्ट झाले.
मतदारांकडून दोन्ही आघाड्यांच्या सरकारचे मूल्यांकन
देशातील दुसर्या क्रमांकाची लोकसंख्या असलेले महाराष्ट्र राज्य आहे. गत पाच वर्षांत लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर राजकीय अस्थिरतादेखील निर्माण झाली. आघाड्यांची अस्थिरता, पडझडदेखील लोकांनी पाहिली. पहिली अडीच वर्षे महाविकास आघाडी, दुसरी अडीच वर्षे महायुतीचे सरकार होते. या दोन्ही आघाड्यांच्या कार्यांचे योग्य मूल्यमापन करून लोकांनी मतदान केले. यात महायुतीची सरशी झाल्याचे स्पष्ट झाले.
महायुतीकडून समाजातील सर्व घटकांसाठी चांगले काम
महायुतीच्या सरकारने महाविकास आघाडीपेक्षा चांगले काम केल्याचे लोकांनी अधोरेखित केले. महायुतीची लोकप्रियता खूप शिखरावर पोहोचल्याचे स्पष्ट झाले. महायुतीने गरीब, सर्वसामान्य, श्रीमंत अशा समाजातील सर्वच घटकांपर्यंत अनेक कल्याणकारी योजना पोहोचवल्या. यातूनच त्यांनी लोकसभेतील खराब कामगिरीवर मात केल्याचे दिसून आले. मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी कल्याणकारी योजना राबविण्याचे महायुतीचे डावपेच यशस्वी झाल्याचे पाहायला मिळाले.
उशिरा बाहेर पडलेल्या मतदारांनी केली जादू
मतदारांनी बेरोजगारी, प्रगती आणि आरक्षण याचा विचार करून मतदान केले. लोकांच्या मनातील उमेदवार निवडण्यात महायुतीने यश मिळवले. त्याचबरोबर निर्णायक जनादेश मिळवण्यात केंद्र आणि राज्यातील नेतृत्व निर्णायक ठरले. समाज माध्यमांवरील प्रचारासह घरोघरी केलेला प्रचार महायुतीला फायदेशीर ठरला. दुपारी 3 नंतर बाहेर पडलेल्या मतदारांनी निर्णायक भूमिका बजावल्याचे स्पष्ट झाले.
लाडकी बहीण योजना ठरली गेम चेंजर
या निवडणुकीत पहिल्यांदाच निवडणुकीच्या केंद्रस्थानी महिला आल्या. महायुतीने राबविलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचे खरे भाऊ महिलांनी निवडून आणले. सर्वेक्षणात सहभाग घेतलेल्या 80 टक्क्यांहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसून आले.
शेतकर्यांनी महायुतीला विजयाकडे नेले
प्रतिकूल हवामान, वाढते कर्ज, घटते उत्पन्न या गर्तेत शेतकरी अडकला होता. यातून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न महायुतीने केले. शेतकर्यांना आधार देण्यासाठी तयार केलेल्या कल्याणकारी योजनांमुळे शेतकर्यांनी महायुतीला मतदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पीएम आणि सीएम किसान योजना, पीक विमा योजना, अल्पभूधारक शेतकर्यांसाठी धन योजना अशा विविध योजना निर्णायक ठरल्या.