Published on
:
01 Feb 2025, 5:15 am
Updated on
:
01 Feb 2025, 5:15 am
पुणे: महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये बोलण्यात येणार्या भाषेचा आणि तिच्या वैशिष्ट्यांचा डिजिटल संग्रह तयार करण्याच्या उद्देशाने पुण्यातील डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ आणि राज्य मराठी विकास संस्थेने मराठी बोलींचे सर्वेक्षण केले असून, त्यातून पहिला मराठीभाषिक नकाशा तयार केला आहे. विश्व मराठी संमेलनाच्या व्यासपीठावर प्रकल्पप्रमुख डॉ. सोनल कुलकर्णी- जोशी यांनी या सर्वेक्षणाची वैशिष्ट्ये आणि मराठीभाषिक नकाशाचे सादरीकरण केले.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, त्याच वर्षी होणार्या विश्व मराठी संमेलनात मराठी बोलींचे सर्वेक्षण आणि पहिला मराठीभाषिक नकाशा सादर करण्याची संधी ही आनंदाची बाब आहे, असे नमूद करत डॉ. सोनल कुलकर्णी यांनी सर्वेक्षणाची माहिती दिली.
डेक्कन कॉलेजचा भाषाशास्त्र विभाग आणि राज्य मराठी विकास संस्थेने 2017 ते 2023 या कालावधीत राज्यातील 34 जिल्ह्यांतील 277 गावांमध्ये सर्व वयोगट- स्तरांतील नागरिकांच्या मुलाखती घेऊन बोलींचे सर्वेक्षण-प्रतिमांकन व आलेखन हा प्रकल्प पूर्ण केला. त्यातून मराठीचा पहिला भाषिक नकाशा तयार झाला आहे, असे त्यांनी सांगितले.
मराठी भाषेतील भौगोलिक भेदांचा भाषावैज्ञानिक अभ्यासासाठी उपयुक्त असा डिजिटल डेटाबेस तयार करणे आणि बोलीभेद निश्चित करण्यासाठी निवडक शब्द-व्याकरणाच्या अनुषंगाने विश्लेषण करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. शब्द, ध्वनी, व्याकरण आणि प्रादेशिक स्तरावर भेद दर्शविणारे हे विश्लेषण व नकाशे संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, असेही डॉ. सोनल कुलकर्णी- जोशी यांनी सांगितले.