मानोरा (Washim):- सर्वसामान्यांना कच्च्या घरातून पक्या घरात जाण्यासाठी पंतप्रधान घरकुल आवास योजना (Pradhan Mantri Gharkul Awas Yojana) शासनाकडून राबविण्यात येत आहे. या योजनेत लाभार्थ्यांना १ लाख २० हजार रुपये अनुदान दिले जाते, पण घरकुल बांधकामासाठी लागणाऱ्या सर्वच साहित्याचे भाव वाढल्याने किमान ५ लाख रुपयावरून अधिक खर्च येत आहे. त्यामुळे सांगा साहेब, १ लाख २० हजार रुपयात घरकुल कसे होईल? असा खडा सवाल घरकुल लाभार्थी समोर उभा ठाकला आहे.
साहेब, सव्वा लाखात घरकुल कसे होणार ?
प्रधानमंत्री आवास योजनेचे वाशिम जिल्ह्यात २०२४-२०२५ या वर्षासाठी २९ हजार ७५२ घरकुलचे लक्ष देण्यात आले आहे. तर मानोरा तालुक्यासाठी यातील ५ हजार ९०९ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. मागील कालावधीतील बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुलांची संख्या जेमतेम ५० इतकी आहे. मंजूर घरकुलापैकी बहुतांश घरांच्या बांधकामाला सुरुवात झालेली नाही. केंद्र शासनाने (Central Govt) सर्वांसाठी घरे २०२२ हा उपक्रम राबविला; पण त्या काळात हा उपक्रम यशस्वी झाला नाही; मात्र हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ५ हजार ९०९ घरकुलांचे लक्ष देण्यात आले परंतु घराच्या बांधकामासाठी किमान ५ लाख रुपये खर्च येतो. १ लाख २० हजार रुपयाचे अनुदान मिळाल्यानंतर उर्वरित ३ लाख ८० हजार रुपये लाभार्थ्यांना खर्च करावे लागते.
जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याची धावाधाव सुरू
ही योजना सामान्य गोरगरिबांसाठी आहे. मात्र या लाभार्थ्यांना ही रक्कम खर्च करणे शक्य नसल्याने ग्रामीण भागात या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. तर दुसरीकडे १०० दिवसाच्या कार्यक्रमात घरकुल योजनेचा समावेश असल्याने जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याची धावाधाव सुरू आहे. तेव्हा हा उपक्रम यशस्वी करायचा झाल्यास घरकुल अनुदानात वाढ करणे अत्यावश्यक आहे.
तेलंगणाच्या धर्तीवर ५ लाख रुपया अनुदान द्या!
१ लाख २० हजारात घरकुलाचे बांधकाम शक्य नाही. याचा विचार करता तेलंगणा सरकार(Telangana Govt) घरकुलसाठी ५ लाखाचे अनुदान देते. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने ही घरकुलचे अनुदान ५ लाख रुपये करावे, अशा आशयाचा ठराव आम्ही पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत घेऊन तो शासनाकडे पाठविला असल्याने त्या ठरावावर शासनाने विचार करावा, असे मत सौ छाया राठोड यांनी व्यक्त आहे.