‘लाडकी बहीण’मुळे विरोधकांचा सुफडा साफ: एकनाथ शिंदेfile photo
Published on
:
01 Feb 2025, 9:59 am
Updated on
:
01 Feb 2025, 9:59 am
सासवड: निवडणूक प्रचारावेळी याच पालखी मैदानात गुलाल उधळण्यासाठी येईन, असा शब्द मी दिला होता. पुरंदरचा किल्लेदार विजय शिवतारे असतील, हेही सांगितलं होतं. पुरंदर-हवेलीच्या जनतेने हा विश्वास सार्थ करत विधानसभा निवडणुकीत साथ दिली. तशीच साथ कायमस्वरूपी द्या.
पुरंदर शत्रूच्या हाती देऊ नका, या माझ्या आवाहनाला पुरंदरवासीयांनी दाद दिली आणि विरोधकांचा बँड वाजवून टाकला. लाडकी बहीणमुळे विरोधकांचा सुफडा साफ झाला, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सासवड (ता. पुरंदर) येथील पालखीतळ मैदानावर शिवसेनेच्या आभार सभेत ते बोलत होते.
शेतकर्यांना विश्वासात घेऊनच विमानतळ
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, विमानतळ शेतकर्यांना विश्वासात घेऊन केले जाईल. अडीच हजार कोटींची तरतूद लॉजिस्टिक पार्कसाठी केली आहे. शिवतारे बापू नेहमी लक्षवेधी असतात. बापू म्हणजे एक घाव दोन तुकडे. कधी कधी मी त्यांना सांगतो, राजकारणात श्रद्धा आणि सबुरी महत्त्वाची असते. सब्र का फल मिठा होता है, असे सांगत शिवतारे यांना येणार्या काळात मंत्रिपद देण्याचे संकेत शिंदे यांनी दिले.
लाडकी बहीण योजना बंद व्हावी म्हणून विरोधक कोर्टात गेले. एका कोर्टाने त्यांना थापडले, आता पुन्हा नागपूर कोर्टात गेले आहेत. पण, ही योजना बंद होऊ देणार नाही. विजय शिवतारे हे अभ्यासू नेतृत्व आहे. पुरंदरचा ढाण्या वाघ आहेत. त्यांच्या नेतृत्वात पुरंदर-हवेलीच्या विकासाचे सर्व प्रश्न सोडविले, जातील असे त्यांनी सांगितले.
आमदार शिवतारे म्हणाले, पुरंदर - हवेलीवासियांनी शिंदे साहेबांच्या शब्दाला जागत पुरंदर शत्रुच्या हातात जाऊ दिला नाही. भविष्यात गुंजवणी, विमानतळ, आयटीपार्क असे प्रकल्प करुन मतदारसंघाच्या विकासासाठी सर्व प्रयत्न आम्ही एकदिलाने करणार आहोत.
ईव्हीएमवरून बोंब, हा रडीचा डाव
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधी पक्षाला टोला लगावत विरोधक जिंकल्यावर लोकशाहीचा विजय असतो. मात्र, हरल्यावर ईव्हीएम खराब असतात. हा रडीचा डाव आहे, असा घणाघात केला.