केंद्रीय अर्थसंकल्प निराशाजनक असून शेतकरी, सर्वसामान्य, कष्टकरी यांना काहीही मिळालेले नाही. या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. करदात्यांना दिलेल्या सवलतीचा उल्लेख करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मोदी सरकारला जबरदस्त टोला लगावला आहे. हा करसवलत म्हणजे राजा उदार झाल्याचे दिसत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. राजा उदार झाला अन् अनेक अटी, छुप्या करांसह करसवलत दिली, असा जबरदस्त प्रहार आदित्य ठाकरे यांनी अर्थसंकल्पावर केला आहे.
याबाबत एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, 2012-14 च्या सुमारास निवडणुकीपूर्वी आयकर रद्द करण्याची घोषणा करणारा भाजप आता अधिक उदार झाल्याचे दिसत आहे. आता ते करांची श्रेणी आणि रिबेटवर करदात्यांशी वाटाघाटी करत असल्यासारखी करसवलत जाहीर करत आहेत. बऱ्याच अटी आणि अनेक छुप्या करांसह ही करसवलत देण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.
Budget 2025:
• The bjp that spoke of abolition of income tax, around the years 2012-14 before election, atleast is now getting more liberal and negotiating with tax payers on slabs and rebates (with a lot of conditions and hidden clauses).
This is the power of the citizens…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 1, 2025
देशात जनतेने आपली ताकद दाखवली आहे. भाजपला जनतेने 240 जागांवर रोखले आहे. याआधी बहुमत असलेल्या सरकार जनतेला गृहीत धरत होते. आता सरकार आयकर सवलती आणि अतर सवलतींबाबत घोषणा करत आहे. मात्र, त्यांनी जाहीर केलेल्या श्रेणींपर्यंत पैसे कसे कमवायाचे, याचे काही मार्ग त्यांनी ठेवले आहेत काय?
देशात सर्वाधिक बेरोजगारी असताना ती रोखण्यासाठी कोणतीही उपाययोजना अर्थसंकल्पात नाही.
अर्थसंकल्पात महाराष्ट्राच अपमान
अर्थसंकल्पीय भाषणात झालेल्या उल्लेखांबद्दल आपण बिहारसाठी खूप आनंदी आहोत. बिहारला अर्थसंकल्पात भरभरून मिळाले आहे. तसेच याआधी बिहारसाठी 2015 मध्ये भाजपने दिलेले 1.25 लाख कोटी रुपयांचे पॅकेज आणि 2024 मध्ये भाजपने दिलेले मोठे पॅकेज त्यांना आधीच मिळाले असले, असा टोलाही त्यांनी लगावला. अर्थसंकल्पातील घोषणा बिहारच्या लोकांच्या गरजा पूर्ण करतात का, असा सवालही त्यांनी केला.
अर्थसंकल्पात महाराष्ट्राचा उल्लेखही न करणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे. सातत्याने सर्वाधिक कर भरणाऱ्यांचा, सर्वाधिक जीएसटी भरणाऱ्या महाराष्ट्र आणि मुंबईतील जनतेचा अपमान करण्यात आला आहे. राज्याला वेळेवर त्याचा पूर्ण जीएसटी मिळत नाही, तसेच विकासासाठी निधीही मिळत नाही. 2014 पासून भाजपने आतापर्यंतच्या सर्व अर्थसंकल्पात महाराष्ट्राकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. यआधीच्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या 100 पेक्षा जास्त आमदारांना निवडून दिल्याबद्दल महाराष्ट्राला शिक्षा मिळत आहे काय? असा सवालही त्यांनी केला.
120 नवीन विमानतळांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उडानचा उल्लेख करण्यात आला. पाटणा विमानतळाचा उल्लेख होता, पण पुण्यातील नवीन विमानतळ ज्याची मागणी सातत्याने होत होती त्याचा उल्लेखही करण्यात आला नाही.