फेशियल त्वचेवरील रक्ताभिसरण सुधारते. फेशियल करताना वापरलेली उत्पादने त्वचेतील मृत पेशी काढून टाकते आणि ओलावा प्रदान करण्यासारखे कार्य करतात. त्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो आणि त्वचा ही निरोगी राहते. 26 ते 30 वर्षे वयापासून फेशियल करता येते. अनेक वेळा पार्लरमध्ये गर्दी असते त्यामुळे पार्लरला गेल्यावर बराच वेळ लागतो. घरच्या घरी ही फेशियल करता येते. घरी फेशियल केल्याने केवळ वेळेची नाही तर पैशांची बचत होते. जर तुम्ही घरी फेशियल करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
फेशियल केल्याने कोरडी त्वचा आणि चेहऱ्यावरील बारीक रेषा कमी होतात यामुळे त्वचा चमकदार आणि तरुण दिसते. अनेक वेळा काहीजण पैसे किंवा वेळेचा विचार करून फेशियल साठी लागणारे उत्पादने घरी आणतात आणि घरी फेशियल करतात. घरी फेशियल करताना काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्हाला त्याचे चांगले परिणाम मिळू शकतील.
फेशियल करण्यापूर्वी या गोष्टी करा
जर तुम्ही घरच्या घरी फेशियल करणार असाल तर लक्षात ठेवा की चेहरा स्वच्छ करणे खूप गरजेचे आहे. यासाठी प्रथम चेहरा धुवा. यानंतर क्लींजिंग मिल्कने चेहरा स्वच्छ करा आणि नंतर फेशियल करायला सुरुवात करा. चेहरा स्वच्छ न करता फेशियल केल्याने छिद्र उघडण्याऐवजी बंद होतील.
उत्पादने लावण्याची वेळ
फेशियल करताना किमान पाच ते सहा स्टेप्स असतात. सध्या ब्रायडल मेकअप फेशियल किट मध्ये दहा स्टेप्स असलेले फेशियल देखील येत आहेत. जर तुम्ही घरच्या घरी फेशियल करत असाल तर चेहऱ्यावर एखादे क्रीम किती वेळ लावायचे हे लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक वेळा लोकांना असे वाटते की चेहऱ्यावर एखादे क्रीम लावून बराच वेळ मसाज केल्याने खूप चांगले परिणाम मिळतात परंतु असे करू नका.
तुमच्या त्वचेचा प्रकार ओळखा
प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी वेगवेगळी उत्पादने वापरली जातात. तुम्ही तुमच्या त्वचेनुसार उत्पादनाची निवड करा. जसे की तुमची त्वचा कोरडी, तेलकट किंवा मिश्र आहे ते ओळखा. संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
घरी फेशियल करताना ही गोष्ट सर्वात महत्त्वाची
जर तुम्ही घरी फेशियल करत असाल तर तुम्हाला चेहऱ्याच्या योग्य स्टेप्स माहिती असणे सर्वात महत्त्वाचे आहे. चुकीच्या स्टेप्स वापरल्यामुळे त्वचा चमकदार आणि घट्ट होण्याऐवजी त्वचा सैल होऊ शकते. फेशियलच्या स्टेप्स माहिती असणारे कोणी असेल तर तुम्ही त्यांना विचारू शकता किंवा ऑनलाईनही त्या स्टेप्स पाहू शकता.
फेशियल केल्यानंतर घ्या ही काळजी
ज्याप्रमाणे फेशियल करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे त्याचप्रमाणे फेशियल केल्यानंतरही काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून त्याचे चांगले परिणाम मिळतील. फेशियल केल्यानंतर उन्हात जाणे टाळा आणि किमान 24 तास चेहऱ्यावर फेस वॉश किंवा साबण लावू नका.