शेख अकबर याला चुडावा पोलिसांनी तेलंगणातून ताब्यात घेतले. Pudhari Photo
Published on
:
01 Feb 2025, 1:01 pm
Updated on
:
01 Feb 2025, 1:01 pm
पूर्णा: पुढारी वृत्तसेवा : नवी आबादी कलमुला (ता.पूर्णा) येथे प्लॉट नावावर करुन का देत नाही? या कारणावरून संतापलेल्या मुलाने डोक्यात लोखंडी सबल-पहार हाणून वडिलांचा निर्घृण खून केला होता. ही घटना बुधवारी (दि.२२) पावणेसहा वाजता घडली होती. शेख अकबर शेख आमीन असे संशयित आरोपीचे नाव आहे. तर शेख आमीन शेख पीर अहेमद (वय ६५) असे खून झालेल्या वडिलाचे नाव आहे. दरम्य़ान, शेख अकबर या घटनेनंतर पसार झाला होता. त्याला चुडावा पोलिसांनी तेलंगणातून ताब्यात घेतले. त्याला आज (दि. १) पूर्णा येथील कोर्टात हजर केले असता ४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. (Parbhani murder case)
उपचारा दरम्यान शेख आमीन शेख पीर अहेमद यांचा नांदेड येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्यानंतर चुडावा पोलीस ठाण्यात शेख अफसर शेख रशीद (रा.कलमुला) यांच्या तक्रारीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी पसार झालेल्या शेख अकबर याच्या शोधासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नरसिंग पोमनाळकर यांनी पोलिसांचे एक पथक स्थापन केले होते.
दरम्यान, खूनाच्या घटनेनंतर पसार झालेल्या आरोपीला तेलंगणा राज्यातील निजामाबाद , श्रीकोंडा पोलीस स्टेशन हद्दीतील चिनमपल्ली या दुर्गम गावात सापळा रचून अटक केली होती. त्याला शुक्रवारी (दि.३१) रात्री बारा च्या सुमारास चुडावा पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील, सपोनि नरसिंग पोमनाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली चुडावा पोलीस ठाण्याचे पोउनि मुखेडकर, पोह राजेश्वर आईटवार, विलास मिटके यांनी केली.