अतुल लिमये. (Image source- X)
Published on
:
25 Nov 2024, 6:22 am
Updated on
:
25 Nov 2024, 6:22 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीला ऐतिहासिक यश मिळाले आहे. या विजयाचे शिल्पकारांपैकी एक आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस अतुल लिमये. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन रणनीती आखली. त्याचबरोबर त्यांच्या सोशल इंजिनिअरिंगने भाजप-महायुतीला एकहात्ती सत्ता मिळण्यात मोठी भूमिका बजावली. जाणून घेवूया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस अतुल लिमये यांच्याविषयी...
अतुल लिमये हे मूळचे नाशिकचे. अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर ते एका बहुराष्ट्रीय कंपनीत रुजू झाले. मात्र सुमारे ९०च्या दशकात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात पूर्णवेळ कार्यरत राहण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपनीतील मोठ्या पगाराची नोकरी सोडली. यानंतर ते पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम करु लागले. प्रारंभीच्या काळात त्यांनी कोकणात संघाचे काम पाहिले. यानंतर सहप्रांत प्रचारक म्हणून त्यांनी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचीही जबाबदारीही संभाळली. २०१४लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ऐतिहासिक यश मिळाले. त्यावेळी अतुल लिमये हे महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्यासह पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाचे प्रभारी होते.
विधानसभा निवडणुकीसाठी तयार केले विविध क्षेत्रातील 'थिंक टँक'
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सहप्रांत प्रचारपदी काम करताना अतुल लिमये यांनी महाराष्ट्रातील सामाजिक आणि कृषी क्षेत्रासमोरील समस्यांचा सखोल अभ्यास केला. संघाचे पश्चिम प्रदेश प्रमुख म्हणून काम करताना त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील भाजप नेत्यांसह विरोधी नेत्यांची बलस्थाने आणि त्रुटींचाही अभ्यास केला. यानंतर लिमये यांनी विधानसभा निवडणुकीसाठी विविध अभ्यास गट आणि थिंक टँक तयार केले. राज्यातील आर्थिक, सामाजिक प्रश्नांसह सरकारी चौकटीत धोरण ठरवण्यापर्यंत विविध मुद्द्यांवर चर्चा करुन त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखली.
अतुल लिमये यांच्या रणनीतीची भाजप-महायुतीला कशी मदत झाली?
या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. यानंतर अवघ्या काही महिन्यांतच विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या. विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी सक्रिय भूमिका बजावण्याचा निर्णय राष्ट्रीयस्वयंसेवक संघाने घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरचिटणीस म्हणून काम करताना विधानसभा निवडणुकीला कसे सामोरे जावे, याबाबत लिमये यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांबरोबर चर्चा केली. याच काळात मराठवाड्यात जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षण प्रश्नी केलेल्या आंदोलनाचे पडसाद राज्यभरात उमटत होते. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना लिमये यांनी विविध मराठा नेत्यांशी संपर्क साधला. मराठा समाजासाठीच्या स्वतंत्र आरक्षणाला पाठिंबा असल्याची हमी त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकार मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पाठपुरावा करेल, असे आश्वासनही दिले. विधानसभा निवडणुकीत नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणात्मक नियोजनाबरोबर अतुल लिमये यांच्या रणनीतीच्या जोरावर भाजप-महायुतीला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लक्षणीय यश मिळाले.