महाराष्ट्राचा पदकवार! वेटलिफ्टिंग, जलतरणात सुसाट; राज्याची 15 पदकांची कमाई

3 hours ago 1

उत्तराखंडातील 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आजचा दिवस महाराष्ट्रासाठी पदकवार ठरला. राज्याच्या ग्रामिण भागातील ध्येयवादी खेळाडूंनी वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्रासाठी 6 तर जलतरणात 4 तसेच अन्य खेळातील 5 अशा एकूण 15 पदकांची कमाई करत स्पर्धेत सर्वाधिक 23 पदके जिंकली. कर्नाटकने सर्वाधिक 7 सुवर्ण जिंकत 12 पदकांसह अव्वल स्थान काबीज केले असले तरी शुक्रवारी महाराष्ट्राने अव्वलस्थानी झेप घेणार हे निश्चित आहे. आज वेटलिफ्टिंगमध्ये सांगलीचा राष्ट्रकुल पदक विजेता संकेत सरगर, सांगलीचीच दीपाली गुरसाळे, पुण्याच्या सारिका शिनगारे व नाशिकच्या मुकुंद आहेरने रुपेरी यशाचे वजन पेलले. लातूरच्या आकाश गौड व पुण्याचा शुभम तोडकर यांनी कांस्य पदकाची कमाई केली.

पंधरा दिवसांपूर्वी गुडघ्याला व स्नायूला मोठ्या प्रमाणात दुखापती होऊनही सांगली जिह्याची खेळाडू दीपाली गुरसाळे हिने या दुखापतीवर मात करीत वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक पटकाविले. दीपाली हिने 45 किलो गटातील स्नॅचमध्ये 69 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 82 किलो असे एकूण 151 किलो वचन उचलले. केरळच्या सुफना जस्मिनने अनुक्रमे 72 व 87 असे एकूण 159 किलो वजन उचलून सुवर्ण पदक काबीज केले.

पुरुषांच्या 61 किलो गटात महाराष्ट्राच्या राष्ट्रकुल पदक विजेता संकेत सरगर याने स्नॅचमध्ये 117 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 142 किलो असे एकूण 259 किलो वजन उचलले आणि रौप्य पदक जिंकले. त्याचाच सहकारी शुभम तोडकरने कांस्य पदक संपादले. त्याने स्नॅचमध्ये 114 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 140 किलो असे एकूण 254 किलो वजन उचलले. राष्ट्रकुल स्पर्धेत हुकलेले सुवर्णपदक आता जिंकायचे असल्याचे संकेत सरगरने दिले.

पुरुष गटातील 55 किलो गटात महाराष्ट्राच्या मुकुंद आहेर व आकाश गौड यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकाची कमाई केली. मुकुंदने स्नॅचमध्ये 112 किलो वजन तर क्लीन व जर्कमध्ये 135 असे एकूण 247 किलो वजन उचलले. आकाश गौडने स्नॅचमध्ये 107 किलो वजन तर क्लीन व जर्कमध्ये 137 असे एकूण 244 किलो वजन उचलत पदकाचाही भार उचलला.

पुण्याच्या सारिका शिनगारेने महिलांच्या 49 किलो गटात रुपेरी यश संपादन केले. तिने स्नॅचमध्ये 79 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 100 असे एकूण 179 किलो वजन उचलत पदकाला गवसणी घातली. छत्तीसगडच्या ज्ञानेश्वरी यादवने अनुक्रमे 85 व 106 असे एकूण 191 किलो वजन उचलून सुवर्ण पदक जिंकले. महिलांच्या 45 किलो गटातील दीपालीने गतवर्षी झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत स्नॅचमध्ये 75 किलो व एकूण 164 किलो वजन उचलून राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. यंदाही तिला राष्ट्रीय विक्रमाची अपेक्षा होती. मात्र पंधरा दिवसांपूर्वी सराव करताना तिच्या गुडघ्यावर आणि स्नायूंची मोठी दुखापत झाली. त्यामुळे आपली राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची संधी मुकणार की काय अशी शंका तिला निर्माण झाली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article