महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2024 चा रणसंग्राम सुरु झाला आहे. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी या लढतीसह मनसेही मैदानात उतरली आहे. महाराष्ट्रात मनसेने 125 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे. राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत जाहीरनामा प्रसिद्ध केला.
महाराष्ट्र नवरनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंकडून पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. ”आम्ही हे करु” या नावाने हा जाहीरनामा आहे. या जाहीरनाम्यात चार महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. महिला, तरुण, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा आणि आश्वासन देण्यात आली आहे.
मनसेच्या जाहीरनाम्यातील प्रमुख 10 मुद्दे
1. मूलभूत गरजा आणि दर्जेदार जीवनमान 2. दळणवळण वीज पाण्याचे नियोजन 3. सक्षम स्थानिक प्रशासन प्रकल्पासाठी लोकसहभाग 4. राज्याची औद्योगिक प्रगती 5. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार 6. गडकिल्ले संवर्धन 7. कृषी आणि पर्यटन क्षेत्राचा विकास 8. राज्याचे करत धोरण सुधारणार 9. डिजिटल प्रशासनाला प्रोत्साहन 10. घनकचरा व्यवस्थापन आणि मलनि:सारण