विद्येचं माहेर समजल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. कुठे चोरी, दरोडा , कुठे ड्रिंक अँड ड्राईव्ह तर कुठे लोक एकमेकांच्या जीवावरच उठल्याचे दिसत आहे. हे कमी की काय म्हणून आता शाळकरी विद्यार्थीदेखील आक्रमक होऊन भांडणं करताना दिसले आहेत. अशीच एक धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. शाळेत ज्ञानार्जनासाठी जाणारे विद्यार्थी शुल्लक वादावरून भांडू लागले आणि एकमेकांच्या जीवावरच उठले. किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर 9 वीतल्या विद्यार्थ्याने रागाच्या भरात दुसऱ्या विद्यार्थ्याचा काचेच्या तुकड्याने गळाच चिरल्याचा अतिशय भयानक प्रकार समोर आला आहे.
पुण्यातील मांजरी भागात ही दुर्दैवी घटना घडली असून त्यामध्ये एक 15 वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणीएका 14 वर्षांच्या विद्यार्थ्याविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
नक्की काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील मांडरी परिसरातील एका शाळेत 9वी मध्ये शिकणारे विद्यार्थी यांच्यात भांडण झालं. शाळेच्या वार्षिक समारंभावरून दोन विद्यार्थ्यांमध्ये शुल्लक वाद झाला, मात्र पाहता पाहता ते भांडण प्रचंड वाढलं. रागाच्या भरात त्या 14 वर्षांच्या मुलाने काचेचा तुकडा घेतला आणि त्या 15 वर्षांच्या मुलाचा गळाच चिरला. यामुळे प्रचंड खळबळ माजली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या, गंभीर जखमी झालेल्या त्या विद्यार्थ्याला कसंबसं रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. याप्रकरणी 14 वर्षांच्या अल्पवयीन आरोपीविरोधात हडपसर पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली. त्या आधारे त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.