खासदार सुप्रिया सुळे यांची महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी जाहीर सभाpudhari
Published on
:
17 Nov 2024, 11:53 am
Updated on
:
17 Nov 2024, 11:53 am
संघर्ष हा आपल्या नशिबातचआहे. आ. अशोक पवार यांच्या संपूर्ण कुटुंबाला त्रास दिला. त्यांना आयुष्यातून संपवण्याचा प्रयत्न केला, पण हा मर्द डगमगला नाही. शरद पवार यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे अशोक पवार नमले नाहीत. शिवाजीराव भोसले बँक अवसायनात गेली. आपल्याच मतदारसंघातील व सर्व ठिकाणाच्या खातेदारांचे, ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. त्याबद्दल व यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार, अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार आ. अशोक पवार यांच्या लोणी काळभोर येथील प्रचार सभेत खा. सुळे बोलत होत्या.
खा. सुळे म्हणाल्या, हा देश अदृश्य शक्तीने चालत नाही, तर हा देश बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो. अशोक पवार यांना श्रीसंभाजी महाराजांच्या स्मारकाच्या उद्घाटन समारंभाला बोलावले नाही. आम्हाला तर नेहमीच विरोधक टाळतात. आम्ही निधीसाठी मागणी केली की आम्हाला निधी देत नाहीत. आर. आर. आबांच्या काळामध्ये जी मोठी पोलिस भरती झाली तशीच मोठी पोलिस भरती आम्ही करणार आहोत. पोलिसांची अडीच लाख पदे रिक्त असल्याचे खा. सुळे यांनी सांगितले.
विरोधकांना संपवण्याची भाषा वापरणार नाही
काळभोर येथे खा. सुळे म्हणाल्या, आम्ही निधी मागितला तर काट मारली जाते, पण बँक लुटणाऱ्यांना मात्र पदक दिले जाते. मी, अशोक पवार व खासदार डॉ. अमोल कोल्हे अशी आमची तिघांची इमानदारी ही ताकद आहे. बारामतीमध्ये अजित पवारांसमोर मंगलदास बांदल यांनी शरद पवारांना संपवण्याची भाषा केली. पण, मी मात्र विरोधकांना संपवण्याची भाषा करणार नाही. मी अशोक पवार यांना विकासासाठी मत मागत आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
आघाडीचे उमेदवार अशोक पवार म्हणाले, युती सरकारने महाराष्ट्राचे राजकारण गढूळ करून टाकले आहे. ४२ आमदारांना आपला मतदारसंघ सोडता येईना. पुणे-सोलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भैरोबा नाला व चौफुला येथे मोठा पूल उभारण्यासाठी मागणी करणार आहोत. या मतदारसंघातील कालवा अस्तरीकरणाला माझा विरोध आहे.
या मतदारसंघातील नर्सरीधारकांचा मोठा प्रश्न आहे. नर्सरीधारकांचे वादळ-वाऱ्यात नुकसान झाले. त्या नर्सरीधारकांना नुकसानभरपाईची तरतूद कशी मिळेल याचा विचार करू, आ. पवार म्हणाले, मी कॉलेज जीवनापासून शरद पवारांचा झेंडा हातात घेऊन काम करीत आहे. मी गद्दारी करणार नाही. कारण गद्दारीचा शिक्का एकदा कपाळावर बसला, तर तो मेल्याशिवाय पुसणार नाही. त्यामुळे मी शेवटपर्यंत निष्ठावान राहणार.
खा. सुळे पुढे म्हणाल्या, अशोक पवार यांना मोठी जबाबदारी देणार आहोत, असे सांगत आ. पवार यांच्या मंत्रिपदाचे संकेत खा. सुळे यांनी दिले, महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारानिमित्त लोणी खासदार सुप्रिया सुळे यांनी विराट जनसमुदायाला मार्गदर्शन केले.
त्या म्हणाल्या, माझी, अशोक पवार व खासदार अमोल कोल्हे यांची इमानदारी ही मोठी ताकद आहे. 'मलिदा गँग' हा शब्द सध्या उच्चारला जात आहे. समोरच्यांनी शिवाजीराव भोसले बँकेकडून कर्ज घेऊन ते बुडवले आहे. त्यामुळे लोकांचे पैसे अडकलेले आहेत. त्यासाठीची ही लढाई दिल्लीपर्यंत न्यावी लागेल, महिला सुरक्षेच्या संबंधित मोठी जबाबदारी आपण घेणार आहोत. बापदेव घाटात घडलेला प्रकार निंदनीय आहे. त्याचप्रमाणे पुण्यामध्ये ड्रग्स, पोर्शे कार दुर्घटना यावर त्यांनी वक्तव्य केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे या वेळी म्हणाले, जून २०१९ मध्ये शिवाजीराव भोसले बँकेत घोटाळा करून तो मयूरी प्रकल्प उभा केला आहे. सगळी बँक खाल्ली आणि आता यांना पुढे आणले आहे. यांना मतदार माहीत नाहीत, गावे माहीत नाहीत. यशवंत कारखाना बंद का केला ? २०१४ मध्ये कारखाना सुरू करू हे आश्वासन दिले होते. काय झालं त्याचं ? आपल्याला शरद पवार यांच्यासोबत राहायचे आहे. अशोक पवार हे शुद्ध चारित्र्याचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. समोरच्या लोकांचे
मंगलदास बांदल यांच्या साक्षीने झालेले करारपत्र काय आहे ते माझ्याकडे आहे. मला कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात जायचे नाही. त्यामुळे अशोक पवार यांना मत म्हणजे शरद पवार यांना मत असे लवांडे म्हणाले. लोणी काळभोर येथील खोकलाई चौकामध्ये झालेल्या या सभेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत गर्दी केली. या वेळी उपसभापती युगंधर काळभोर, आप्पासाहेब काळभोर, माजी सरपंच माधुरी काळभोर, माजी सरपंच चंदर शेलार, माधव कळभोर, विकास लवांडे, जगन्नाथ शेवाळे, शरद काळभोर, सागर काळभोर, भारती शेवाळे, स्वप्निल कुंजीर, नाना आबनावे, सनी काळभोर, नागेश काळभोर, संदीप गोते, माधुरी काळभोर, राजेंद्र खांदवे, संतोष कुंजीर, स्मिता नॉर्टन, गोरख सातव, जगदीश महाडिक, अशोक पवार यांचे पुत्र श्रीराज पवार, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.