Published on
:
24 Jan 2025, 1:10 am
Updated on
:
24 Jan 2025, 1:10 am
सोलापूर : मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक अडचण जाणवू नये. या हेतूने पालकांनी भारतीय डाक विभागात 22 जानेवारी 2015 ते 22 जानेवारी 2025 पर्यंत सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत राज्यात 31 लाख 15 हजार 203 खाती उघडली आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या लाडक्या मुलींच्या उच्च शिक्षणासह लग्नाची चिंता दूर करुन भविष्य सुरक्षित केल्याचे दिसून येते.
भारतीय डाक विभागाची सुकन्या समृद्धी योजना ही जास्तीचा लाभांश देणारी योजना लोकप्रिय ठरत आहे. शून्य ते दहा वयोगटातील लहान मुलींसाठी ही योजना आहे. मुलीचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी पालक या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेंतर्गत वर्षाला 250 रुपये किमान रक्कम भरून या योजनेत सहभागी होता येते. कमाल दीड लाख रुपयांपर्यंत या योजनेच्या खात्यात रक्कम जमा करण्याची मुभा आहे. राज्यातील मुलींच्या पालकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट कार्यालयाकडून जनजागृती सुरू आहे.
शून्य ते दहा वर्षे वयोगटातील मुलींचे आई-वडिलांना खाते उघडता येते. एका कुटुंबात फक्त दोन खाती सुरू करता येतात. योजनेंतर्गत निर्माण करण्यात आलेले खाते वयाच्या 21 वर्षाला परिपूर्ण होतात. बालिकेच्या 18 वर्षे वयाला जमा खात्यातील 50 टक्के रक्कम काढता येणार आहे. सुकन्या समृद्धी योजनेत सहभागी होण्यासाठी 250 रुपयात खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे. योजनेत 8.2 टक्के वार्षिक व्याज मिळते.
सुकन्या समृद्धी योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या बचतीने पालकांच्या मुलींच्या शिक्षणाची, लग्नाची चिंता मिटली आहे. पालकांना बचत करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा योजनेचा मुख्य हेतू आहे.
- के. नरेंदर बाबू, प्रवर अधीक्षक, डाकघर, सोलापूर