Published on
:
20 Nov 2024, 5:11 pm
Updated on
:
20 Nov 2024, 5:11 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी (Maharashtra Assembly Election 2024 Voting) आज (दि.20) मतदान पार पडले. राज्यात टक्के 62.2 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण 4,136 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद झाले. आता 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज राज्यातील काही भागात मतदानादरम्यान ईव्हीएम बंद पडणे, ईव्हीएम मशिनची तोडफोड आणि वादावादीच्या घटना घडल्या. सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग कमी राहिला. पण दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला.
१ लाख १८६ मतदान केंद्रावर आज मतदान पार पडले. यात शहरातील ४२,६०४, ग्रामीण ५७,५८२ आणि २४१ सहायक मतदान केंद्राचा समावेश आहे.
बीड : घाटनांदूर येथे ईव्हीएम मशीनची तोडफोड
बीडच्या परळी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते अॅड. माधव जाधव यांना मारहाण झाल्याच्या प्रकारानंतर घाटनांदूर येथे तीन बूथवरील मतदान यंत्र तसेच इतर साहित्याची तोडफोड करण्यात आली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बन्सी शिरसाठ यांची गाडीदेखील फोडण्यात आली. घाटनांदूर येथे तीन बूथवरील मतदान यंत्र फोडल्यानंतर चोथेवाडी आणि मुरंबी येथील मतदान केंद्रातही तोडफोड करण्यात आली.
बारामतीत दोन्ही पवारांचे कार्यकर्ते भिडले
बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्यातील लढतीत दोन्ही पवारांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे दिसले. शहरातील महात्मा गांधी बालक मंदिर शाळेतील केंद्रावर अजित पवार आणि शरद पवार गटात वाद झाला. या ठिकाणी अजित पवार यांच्या नावाच्या चिठ्या वाटल्या जात असून कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप मविआचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी केला. तर हा त्यांचा रडीचा डाव असल्याचे प्रत्युत्तर अजित पवार यांचे निवडणूक प्रतिनिधी किरण गुजर यांनी केला.
Maharashtra election 2024 : नांदगावात कांदे- भुजबळ समर्थकांत राडा
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघात राडा झाला. शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांनी काही मतदारांना मतदानासाठी मतदान केंद्रावर आणले असता अपक्ष उमेदवार समीर भुजबळांच्या समर्थकांनी त्यांना अडवले. यानंतर धक्काबुक्की आणि दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची पाहायला मिळाली. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
चंद्रपूर : चिमूरमध्ये भाजप- काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात भाजप- काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला. हा प्रकार मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात घडला.