नागपूर : रामटेकच्या सांस्कृतिक वैभवाला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रामटेक येथे व्यापक सांस्कृतिक महोत्सवाची आवश्यकता होती. गतवर्षीपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महोत्सवाची सुरूवात केली. तीन दिवस चालणारा हा महोत्सव येथील सांस्कृतिक वैभवासह पर्यटन क्षेत्राला चालना देणारा ठरेल, असा विश्वास राज्यमंत्री ऍड आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केला.
रामटेक येथे पर्यटन व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, माजी आमदार आनंदराव देशमुख यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी मंचावर रामटेकचे उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन, पर्यटन विभागाचे उपसंचालक प्रशांत सवाई, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, तहसीलदार रमेश कोळपे, मुख्याधिकारी नितीन लुंगे उपस्थित होते.
स्वयंरोजगाराच्या दृष्टीने पर्यटन क्षेत्र एक मोठी संधी आहे. रामटेकला आध्यात्मिक क्षेत्रासह विपुल प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती लाभलेली आहे. येथील ४०० वर्ष जुने असलेले श्रीराम मंदिर, बाराशे वर्ष जुने असलेले कपूर बावडी, पेंच व्याघ्र प्रकल्प, मोठे तलाव, हे सारे वैभव पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देणारे आहे. महाराष्ट्र शासन यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील असून येथील स्थानिक रोजगाराला चालना देण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचे आशीष जयस्वाल म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुळकर्णी यांनी केले.
अयोध्येतील रामलला प्रतिष्ठापनेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रामटेक येथील नेहरू मैदानावर आयोजित या महोत्सवाचा पहिला दिवस गीत, संगीत व नाटकाच्या प्रस्तुतीने राममय झाला. पुनीत इस्सर लिखित, निर्मित आणि दिग्दर्शित "जय श्री राम - रामायण" या कालातीत महाकाव्याच्या मनमोहक सदरीकरणाने राम भक्त भारावले. १३ मूळ साउंडट्रॅक, अद्भुत सेट सेटिंग्ज, लाइव्ह बॅकग्राउंड स्कोअर, भव्य एलईडी, आकर्षक ऑडिओ व्हिज्युअल्स, कथक नृत्य आविष्कार, लाइव्ह अॅक्शन आणि फाईट सीन या सर्वांनी भरगच्च भरलेल्या " जय श्री राम - रामायण" नाट्यसादरीकरणाला प्रेक्षकांनी कलाकारांना उत्स्फूर्त दाद दिली. मुख्य कलाकारांमध्ये पुनीत इस्सार यांनी रावण तर सिद्धांत इस्सार यांनी राम आणि विंदु दारासिंह यांनी हनुमानाची भूमिका साकारली.
शहनाज यांनी केला प्रभू श्रीरामाचा जयजयकार
अयोध्येतील श्री रामलला प्रतिष्ठापनेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महाराष्ट्राची अयोध्या असलेल्या रामटेकमध्ये भजन गायिका शहनाज अख्तर यांनी आपल्या खड्या आवाजात भक्तिगीते सादर केली. लहानपणापासून रामटेक येथे मी येत असून त्याच्याच आशीर्वादाने गायिका झाल्याचे त्यानी सांगितले. यावेळी राम आयेंगे, मंगल भवन अमंगल, मैया अंबादेवी, उजैन मे हर रंग के दिवाने असे भगवान शिव शंकर, श्री रामाचे सुमधुर भजनांनी वातावरण भक्तिमय केले. आमचे दैवत छत्रपती.. हे गीत सादर करून रसिकांमध्ये उत्साह भरला.जलतरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.विविध सहा वयोगटात पहिल्या तीन जलतरणपटूंना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.