Published on
:
27 Nov 2024, 6:25 am
Updated on
:
27 Nov 2024, 6:25 am
पालघर : पुढारी वृत्तसेवा
पालघर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील रुग्णवाहिका व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळे एका गरोदर महिलेसह तिच्या बाळाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही मृत गरोदर महिला डहाणू तालुक्यातील सारणी या गावातील असून पिंकी डोंगरकर (राहणार सारणी, तालुका डहाणू) असे तिचे नाव आहे. रुग्णवाहिका उशिरा मिळाल्यानंतर वलसाड येथे उपचारासाठी नेत असताना अर्ध्या रस्त्यात तिच्यासह तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याची ही दुःखद घटना घडली.
या विषयी अधिक माहिती अशी की, प्रसूती वेदना जाणवू लागल्यावर पिंकी यांना तातडीने उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मंगळवारी प्रसूतीसाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करताच तिची परिस्थिती चिंताजनक बनली. मात्र, तिची प्रकृती गंभीर होत असल्याने तिला गुजरातच्या वलसाड येथील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला कासा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला. यावेळी 108 क्रमांकाच्या आपत्कालीन रुग्णवाहिकेची मदत घेण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु, ऑक्सिजनसारख्या अत्यावश्यक सुविधांचा अभाव असल्याने रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध झाली नाही.
या विलंबामुळे गर्भवती महिलेच्या जीवाला धोका निर्माण झाला. रुग्णालय प्रशासनाने कासा उपजिल्हा रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध करून दिली. मात्र, तोपर्यंत महिलेने प्रसूतीच्या तीव्र वेदना सहन केल्या. त्यानंतर डॉक्टर व उपचार सुविधा उपलब्ध नसलेल्या एका रुग्णवाहिकेतून पिंकी यांना वलसाड येथे घेऊन जात असताना गुजरातच्या भिलाड जवळ पोहोचताच तिचा तिच्या पोटातील बाळासह मृत्यू झाला. याआधीही आरोग्य व्यवस्था व रुग्णवाहिका व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका अशा अनेक गरोदर मातांना बसलेला आहे व त्या दगावल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. त्यामुळे पालघर जिल्ह्यात अद्ययावत रुग्णवाहिका व्यवस्थापन उभे राहणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
आरोग्य व्यवस्थेतील हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेचा जीव गेल्याने प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. वेळेवर आणि योग्य सुविधा पुरवण्यात प्रशासन अपयशी ठरत असेल, तर याचा फटका सामान्य नागरिकांना बसणार हे निश्चित आहे. त्यामुळे ही यंत्रणा सक्षम आणि गतिमान करण्यासाठी ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे.
108 आपत्कालीन सेवा अपयशी ठरली?
108 रुग्णवाहिका ही जीवनावश्यक सेवा असूनही तात्काळ सुविधा उपलब्ध होण्यात अडथळा निर्माण झाला. उधवा येथे रुग्णवाहिका असतानाही ऑक्सिजन अभावामुळे तिला पाठवण्यात उशीर झाला. या घटनेमुळे 108 सेवांच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रुग्णवाहिकांचा अभाव व देखभाल दुरुस्ती नसल्याने रुग्णांना जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी 108 क्रमांकाच रुग्णवाहिका उपलब्ध नसतात. अशावेळी गोरगरीब रुग्णांसह अशा गरोदर मातांना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. त्यामुळे जर्जर झालेल्या रुग्णवाहिका व्यवस्थेला नव्या उभारीची गरज अधोरेखित होत आहे.
या घटनेमुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला असून, कासा उपजिल्हा रुग्णालयात 108 रुग्णवाहिका सेवा सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वेळेवर सुविधा उपलब्ध नसल्याने भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची खात्री प्रशासनाने द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.