पोन्नानी ते त्रिशूर मेडिकल कॉलेजला जाणाऱ्या रुग्णवाहिकेला एक कारचालक जाणूनबुजून अडवत असल्याचे व्हिडिओ चित्रीकरणात स्पष्ट झाले.
Published on
:
18 Nov 2024, 10:11 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : रस्त्यावरुन रग्णवाहिका भरधाव वेगाने जात असेल तर निश्चित रुग्णासाठी आपत्तकालीन परिस्थितीच असते. रुग्णाला लवकरात लवकर उपचार मिळावेत यासाठी रुग्णवाहिका वाहतूक कोंडीतीही सायरन वाजवत वाट काढते. त्यामुळे रुग्ण घेऊन जाताना किंवा रुग्णाला आणायला जाणाऱ्या रुग्णवाहिकेला वाट देणे सर्वांचीच कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी आहे. मात्र अनेकवेळा रुग्णवाहिकेला अडथळा करण्याचेही प्रकार घडतात. अशाच एका प्रकाराची केरळ मोटार वाहन विभानागे गंभीर दखल घेतली आहे. रुग्णवाहिकेला जाणूनबुजून अडथळा निर्माण करणार्या कार चालकारचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यात आले आहे. तसेच त्याला दंडही ठोठावण्यात आल्याचे वृत्त 'इंडिया टूडे'ने दिले आहे.
व्हिडिओ शेअर झाल्याने प्रकार उघड
'पॅरामेडिक्स'ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पोन्नानी ते त्रिशूर मेडिकल कॉलेजला जाणाऱ्या रुग्णवाहिकेला एक कारचालक जाणूनबुजून अडवत असल्याचे दाखवले आहे. रुग्णवाहिका चालकाने सतत हॉर्न वाजवला आणि सायरन वाजवला तरीही कार चालकाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असणार्या रुग्णवाहिकेला वारंवार अडथळा आणला. ७ नोव्हेंबर २०२४ रोजी हा प्रकार घडला होता.
केरळ मोटार वाहन विभागाने गंभीर दखल
कारचालक रुग्णवाहिकेला अडथळाला आणत असल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर झाला. या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल केरळ मोटार वाहन विभागाने घेतली. अधिकार्यांनी कारच्या नंबरवरुन चालकाची ओळख पटवली. यानंतर कायदेशीर कारवाई सुरू केली. चालकावर आपत्कालीन वाहनास वाट न देणे, अधिकृत प्राधिकरणाच्या कार्यात अडथळा आणणे आणि वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUCC) न बाळगणे आदी मोटार वाहन कायद्यामधील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मोटार वाहन कायद्याच्या कलम 194E नुसार, रुग्णवाहिकेला रस्ता देण्यास नकार दिल्यास सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास, दहा हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
रुग्णाहिकेला वाट करुन देणे ही कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी
रुग्णवाहिकेला जाणूनबुजून अडथळा निर्माण करणार्या कार चालकारचे ड्रायव्हिंग लायसन्स केरळ मोटार वाहन विभागाने रद्द केले आहे. तसेच त्याला 6,250 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. केरळ मोटार वाहन विभागाने म्हटलं आहे की, रुग्णवाहिकांना स्पष्ट मार्ग मिळण्याची खात्री करणे ही कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी आहे. अन्य चालकांच्या चुकीच्या वर्तनामुळे गंभीर वैद्यकीय मदतीला विलंब होवून रुग्णांचा जीवही धोक्यात येऊ शकतो.