ट्रान्स हार्बरमार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आला. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक होता. या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रयत्नामुळे वाशी, पनवेल, बेलापूर, खारघरसाठी विशेष बसेस सोडण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून प्रवाशांना मार्गदर्शन केले.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजय देसाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी नवी मुंबई परिवहन सेवा प्रशासनाशी संपर्क साधून त्यांना वेळेत जादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यासाठी विनंती केली. त्यानुसार आज जादा बसेस सोडण्यात आल्या. मुंबई परिवहन सेवेचे अधिकारीदेखील उपस्थित होते. तसेच शिवसेनेच्या कळवा शहरातील अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रवाशांना सहकार्य व मार्गदर्शन केले. कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
रिक्षाचालकांचे सहकार्य
रिक्षाचालक यांनीही चांगले सहकार्य केले. सदर मार्गावरील बसेस कमी असल्याने पुणे, अलिबाग, कोकण इत्यादी मार्गावरील लांबपल्ल्याच्या गाड्या थांबवण्यात आल्या. तसेच पनवेल, बेलापूर, खारघर येथे प्रवाशांना सोडण्यासाठी विनंती करून बसेसची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाप्रमुख विजय देसाई यांनी दिली.