Published on
:
28 Nov 2024, 10:23 am
Updated on
:
28 Nov 2024, 10:23 am
अंगणात मंडप... घरात लग्नसोहळ्याची लगबग... पै-पाहुण्यांचा राबता, असे सगळा आनंदाचे वातावरण असतानाच याच लगीनघरी अचानक बिबट्याच्या मादीने एन्ट्री केली अन् अलगद ती वन विभागाने लावलेल्या पिंजर्यात जेरबंद झाली. कोणाच्याच ध्यानीमनी नसताना एकाएकी घराजवळच बिबट्याची मादी जेरबंद झाल्याचे समजताच सर्वांचीच पाचावर धारण बसली. सुदैवाने या बिबट मादीकडून कोणताही उपद्रव झाला नाही; अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. हा प्रकार जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी हद्दीतील खंडागळे मळ्यात बुधवारी (दि. 27)
पहाटे 4 वाजता घडला. खंडागळे मळ्यात दौलत खंडागळे यांचे घर आहे. बुधवारी त्यांच्या मुलाचा विवाह असल्याने घरी पै-पाहुणे मंडळी मोठ्या संख्येने आलेले होते. नेहमीप्रमाणे सर्वजण लग्नाच्या धांदलीत मग्न होते. सर्वजण आनंदी वातावरणात वावरत होते. मंगळवारी सर्वजण झोपी गेले. बुधवारी सकाळी झोपेतून उठताच सर्वांनाच धक्का बसला. कारण पहाटेच्या सुमारास लग्नाच्या घराजवळच असलेल्या जनावरांच्या गोठ्यालगत वन विभागाने लावलेल्या पिंजर्यात बिबट्याची मादी जेरबंद झाली होती. ही माहिती समजताच सर्वांची भीतीने गाळण उडाली. या मादीला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
याबाबतची माहिती वन विभागाला देण्यात आली. त्यानुसार उपवनसंरक्षक अमोल सातपुते, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, वन कर्मचारी खंडू भुजबळ हे घटनास्थळी दाखल झाले. जेरबंद झालेली बिबट्याची मादी अंदाजे 2 वर्षांची असल्याचे त्यांनी सांगितले. बिबट मादीला ताब्यात घेत वन कर्मचारी माणिकडोह बिबट निवारण केंद्राकडे रवाना झाले. उपसरपंच संतोष मोरे, दौलत खंडागळे, पोलिस पाटील सचिन टाव्हरे, ग्राम सुरक्षारक्षक दल जवान रामकृष्ण चोपडा, तुषार टेके, आदित्य डेरे, रघू खंडागळे, संतोष खंडागळे, शंतनु डेरे, दर्शन खंडागळे, आपदा मित्र सुशांत भुजबळ आदींनी वन कर्मचार्यांना मदत केली.
15 दिवसांपूर्वीच लावला होता पिंजरा
बिबट्यांनी या परिसरात धुमाकूळ घातला होता, त्यामुळे 15 दिवसांपूर्वी या ठिकाणी पिंजरा लावला होता. याच पिंजर्यात ही बिबट मादी जेरबंद झाली. त्यामुळे स्थानिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आणखी वावर असलेल्या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही करण्यात येत आहे.