Published on
:
17 Nov 2024, 7:16 am
Updated on
:
17 Nov 2024, 7:16 am
पुढारी ऑनलाईन डेस्क: मुंबईतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) कस्टमर केअर सेंटरला पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा 'सीईओ' बोलत असल्याचा धमकीचा फोन आला, असे RBI केअर सेंटरमधील अधिकाऱ्यांनी रविवारी (दि.१७) सांगितले.
पीटीआय या वृत्तसंस्थेला मिळालेल्या माहितीनुसार, "लष्कर-ए-तैयबाचा सीईओ" म्हणून दावा केलेल्या या व्यक्तिने शनिवारी सकाळी 10 वाजता आरबीआयला फोन केला. त्याने सांगितले की, "तो लष्कर-ए-तैयबाचा सीईओ आहे आणि मागील गेट बंद करा. इलेक्ट्रिक कार खराब झाली आहे." एवढं बोलल्यावर कॉल डिस्कनेक्ट झाला. अधिकाऱ्यांना मागचा रस्ता अडवण्यास सांगितले. तसेच इलेक्ट्रिक कार खराब झाली आहे, असेही त्याने बोलले.
धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा
कॉल डिस्कनेक्ट झाल्यानंतर बँकेच्या सुरक्षा रक्षकाने प्रकरणाचे गांभीर्य समजून पोलिसात तक्रार केली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. माता रमाबाई मार्ग पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत हा कुणाचा तरी खोडसाळपणा असल्याचे पोलिसांना वाटत होते.
यापूर्वी देखील धमकीचे कॉल
आरबीआय व्यतिरिक्त, अनेक कंपन्यांना यापूर्वीही अशा धमकीच्या कॉलचा सामना करावा लागला आहे. 14 नोव्हेंबर रोजी मुंबईतील जेएसए लॉ फर्म बॅलार्ड पेअर आणि जेएसए ऑफिस कमला मिल लोअर पर्ल यांनाही धमक्या आल्या होत्या. ही धमकी फरजान अहमदच्या मेलवर आली आहे. या मेलमध्ये कंपनीला बॉम्बची धमकी देण्यात आली होती. धमकी मिळाल्यानंतर फर्मच्या कर्मचाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.