विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पाशवी बहुमत मिळाले. पाशवी बहुमत देशाला आणि राज्याला हानीकारक आहे. यामुळे हुकुमशाही, मनमानी वाढत जाते. लोकशाहीचा पदोपदी खून होतो, भ्रष्टाचार वाढतो, अदानीसारखी भूतं निर्माण होतात, असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी लगावला. ते दिल्लीत माध्यमांशी संवाद साधत होते.
ते पुढे म्हणाले की, कुणाला मुख्यमंत्री करायचे हा भाजपचा प्रश्न आहे. मात्र महाराष्ट्राला नवीन सरकार मिळावे. कारण लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे बहिणी नवीन सरकारची वाट बघताहेत. कर्जमाफीचीही घोषणा करण्यात आली होती, त्याचीही शेतकरी वाट पाहत आहेत. बहिणी, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार सगळेच वाट पाहत असून सरकार ताबडतोब यावे.
अद्याप मुख्यमंत्री कोण होणार हे निश्चित झालेले नाही. दररोज वेगळी बातमी येत आहे. मात्र 26 तारखेला विधानसभेची मुदत संपली आहे. आम्ही सरकार बनवू अशी आशा असताना 26 तारखेपर्यंत सरकार बनले नाही तर राष्ट्रपती शासन लावू अशी भीती दाखवत होते. आताही सरकार बनत नसून महायुतीत गोंधळ असल्याने राष्ट्रपती राजवट लावण्यात यावी, अशी मागणी राऊत यांनी केली.
मुख्यमंत्रीपदावरून भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांचे तंगड्यात तंगडे अडकले असून एकमेकांच्या छातीवर बसण्याचा कार्यक्रम सुरू आहे. मुख्यमंत्री कुणीही बनले तरी कारभार दिल्लीतूनच चालणार आहे. त्यामुळे त्या पदावर फक्त कटपुतली बसवायची आहे, असेही राऊत यावेळी म्हणाले.
आतापर्यंत दिल्लीतील भाजप नेतृत्वाने डोळे वटारले की सगळे गप्प बस होते. पण त्यांनी महाराष्ट्रात जे बंडखोर निर्माण केले ते आता त्यांच्या वटारलेल्या डोळ्यांना पाहून गप्प बसत नाहीत. ते मोदी-शहांना आव्हान देताना दिसताहेत, असेही राऊत म्हणाले. भाजपचा शब्द गांभीर्याने घ्यायचा नसतो. वापरा आणि फेका हीच भाजपची भूमिका असून शब्द फिरवल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण कसे फिरले हे सर्वांना माहिती आहे. फिरवलेल्या शब्दाचा सर्वात मोठा बळी शिवसेना आहे. भाजप कधीच शब्द पाळत नाही. मग तो शब्द खुलेआम दिलेला असो किंवा बंद दाराआड असो, हिंदुहृदयस्रमाट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत दिलेला असो, पंतप्रधानांसमोर दिलेला असो किंवा अमित शहांच्या कार्यालयात दिलेला असो, असेही राऊत म्हणाले.
शब्द पाळणे हे भाजपवर कधीच बंधनकारक नसते. ती नैतिकता ते पाळत आलेले नाहीत. त्यांना एखादा पक्ष फोडण्यासाठी, सरकार पाडण्यासाठी जेव्हा एखाद्याची गरज असते तेव्हा ते आश्वासनांची आणि वचनांची बरसात करतात. त्यांचे काम भागले की लाथा घालतात. हे आता महाराष्ट्रात दिसतेय. शिवसेना-भाजप एकत्र होती तेव्हा हा अनुभव आम्ही घेतलेला आहे, असेही राऊत म्हणाले