Published on
:
18 Nov 2024, 1:50 pm
Updated on
:
18 Nov 2024, 1:50 pm
नागपूर : येत्या बुधवारी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार तोफा अखेर आज सोमवारी विदर्भात शांत झाल्या. बहुतांशी उमेदवारांनी महारॅली न काढता वार्ड, प्रभागनिहाय संपर्कावरच अधिक भर दिला. दुसरीकडे पदाधिकारी व्होटर स्लिप व इतर प्रचार साहित्य घेऊन घरोघरी पोहोचले. आता खऱ्या अर्थाने निवडणूक, मतांची बेरीज,वजाबाकी रंगात येणार आहे.
सर्वच राजकीय पक्षांकडून ‘मिशन विदर्भ’
राज्यात सत्ता प्राप्तीच्या दृष्टीने ६२ जागा असलेला विदर्भ विधानसभा निवडणुकीत सर्वांनाच हवाहवासा वाटतो. यामुळे साहजिकच सर्वच राजकीय पक्षांनी 'मिशन विदर्भ' हाती घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंग शिवराज सिंग चव्हाण स्मृती इराणी, योगी आदित्यनाथ, स्मृती इराणी अशा अनेक नेते, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांनी विदर्भात भाजप महायुतीसाठी प्रचार केला. महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी राहुल गांधी प्रियंका गांधी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे यांनी जोर लावला.
प्रियांका गांधींच्या रोड शो वेळी तणाव
कंगना राणावत, रवी किशन, मिथुन चक्रवर्ती असे अनेक स्टार, सेलिब्रिटी देखिल रोड शोच्या निमित्ताने विदर्भाच्या रस्त्यावर उतरले. यवतमाळ जिल्ह्यातील वणी, राळेगाव आणि अमरावती येथे सभा घेत राज ठाकरे यांनी प्रचाराचा विदर्भात श्रीगणेशा केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ६ नोव्हेंबरला रेशिमबागेतील सुरेश भट सभागृह येथील संविधान सन्मान संमेलनाच्या निमित्ताने विविध संघटनांशी संवाद साधत प्रचाराचा श्रीगणेशा केला. प्रचार तोफा थंडावण्याच्या एक दिवस पूर्वी रविवारी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी नागपुरातील तीन मतदारसंघात संघ मुख्यालय जवळच्या भडकत चौकात रोड शो केला. त्यांच्या रोडचा शोचा समारोप काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आल्याने काहीसा वादळी ठरला. शिवसेना नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ७ व ८ रोजी दर्यापूर, तिवसा, बडनेरा, बाळापूर, बुलडाणा, मेहकर येथे सभा घेतल्या.
यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पूर्व नागपूर, तिरोडा, काटोल, हिंगणघाट येथे सभा घेतल्या. याशिवाय मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, पवन कल्याण यांच्यासोबतच आंध्र, तेलंगणा, कर्नाटक, हिमाचल अशा विविध राज्यातील नेत्यांनी विदर्भ पिंजून काढला. आपण जे बोललो ते करून दाखवले सांगण्याचा प्रयत्न केला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा, रोडशोचा विदर्भात झंझावात पहायला मिळाला. एकंदरीत सर्वांचेच विदर्भावर विशेष लक्ष होते. अर्थातच विदर्भाची जनता कुणावर मेहरबान होणार हे 23 नोव्हेंबरला ईव्हीएममधूनच उघड होणार आहे.