विधानसभेतही ट्रम्पेट चिन्हाचा तुतारीला फटका:9 ठिकाणी शरद पवार गटाच्या उमेदवारांपेक्षा अपक्षांना जास्त मते

2 hours ago 1
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. तर महाविकास आघाडीला जनतेने नाकारल्याचे दिसून आले. सध्या निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण केले जात असून काही जागांवर ट्रम्पेट चिन्हामुळे शरद पवारांच्या पक्षाला फटका बसल्याचे समोर आले आहे. 9 मतदारसंघात ट्रम्पेट चिन्ह असणाऱ्या अपक्ष उमेदवारांना शरद पवारांच्या पक्षाच्या उमेदवारापेक्षा जास्त मते मिळाल्याचे दिसून आले. ट्रम्पेटला मिळणारी मते शरद पवार यांच्या पक्षाला मिळाली असती, तर या नऊ जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झाले असते, असे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीतही सातारा तसेच इतर लोकसभा मतदारसंघात ट्रम्पेट चिन्हामुळे शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. तर काही ठिकाणी तुतारी चिन्ह असणाऱ्या अपक्ष उमेदवाराला जास्त मते मिळाली होती. त्याचीच प्रचिती यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही आली. शहापूर, बेलापूर, केज, परंडा, अणुशक्तीनगर, जिंतूर, घनसावंगी, आंबेगाव, पारनेर, या विधानसभा मतदासंघात शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा जेवढ्या मतांनी पराभव झाला आहे, त्यापेक्षा अधिक मते ट्रम्पेट हे निवडणूक चिन्ह असलेल्या उमेदवारा मिळाली आहेत. कोण-कोणत्या मतदारसंघात बसला फटका? शहापूर येथे शरद पवार गटाचे पांडुरंग बरोरा यांचा 1 हजार 672 मतांनी पराभव झाला. येथे ट्रम्पेट चिन्ह असलेल्या अपक्ष उमेदवाराला 3 हजार 892 मते मिळाली. बेलापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे संदीप नाईख यांना अवघ्या 377 मतांनी पराभव पत्करावा लागला. येथे ट्रम्पेटला 2 हजार 860 मते मिळाली. केज मतदारसंघात शरद पवारांच्या पक्षाचे पृथ्वीराज साठे यांचा 2 हजार 687 मतांनी पराभव झाला. ट्रम्पेटला 3 हजार 559 मते मिळाली. परंडा येथे राहुल मोटे यांचा 1 हजार 509 मतांनी पराभव झाला. ट्रम्पेटला 4 हजार 446 मते मिळाली. अणुशक्तीनगर येथे अभिनेत्री स्वरा भास्करचे पती आणि शरद पवार गटाचे उमदेवार फहाद अहमद यांचा 3 हजार 378 मतांनी पराभव झाला. तर येथे तुतारीला 4 हजार 075 मते मिळाली. जिंतूर मतदारसंघात शरद पवार यांच्या पक्षाचे विजय भांबळे यांचा 4 हजार 516 मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. तर तुतारी म्हणजेच ट्रम्पेटला 7 हजार 430 मते पडली. घनसावंगीमध्ये माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा 2 हजार 309 मतांनी पराभव झाला. येथे ट्रम्पेट या चिन्हाला 4 हजार 830 मते मिळाली. आंबेगाव येथे शरद पवार यांच्या पक्षाचे देवदत्त निकम यांचा 1 हजार 523 मतांनी पराभव झाला. तर तुतारी म्हणजेच ट्रम्पेट चिन्ह असणाऱ्या उमेदवाराला 2 हजार 965 मते मिळाली. पारनेर मतदारसंघात शरद पवार यांच्या पक्षाच्या आणि निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा 1 हजार 526 मतांनी पराभव झाला. येथे ट्रम्पेटला 3 हजार 582 मते मिळाली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article