>> स्पायडरमॅन
हस्तलेखन अर्थात हाताने लिहिण्याची कला ही 5500 वर्षांपासून मानवाला साथ देत आली आहे. स्टॅव्हॅन्जर युनिव्हर्सिटीने नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात सध्याची नवी पिढी मात्र ही लेखनकला विसरत चालली आहे, असा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. 1990 च्या दशकाचा शेवट आणि 2010 च्या दशकाची सुरुवात या कालावधीत जन्माला आलेल्या लोकांना ‘जेन झेड’ म्हणून ओळखले जाते. या ‘जेन झेड’मधील 40 टक्के हाताने लेखन करण्याच्या कलेवरील आपली पकड गमवत आहेत असे आढळून आले आहे. फार पूर्वीपासून संवाद साधण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणारे लेखन आता या नव्या डिजिटल युगात मागे पडायला लागल्याचे चित्र आहे.
डिजिटल तंत्रज्ञानामुळे आपले परस्परांशी संवाद साधण्याचे माध्यम पूर्णपणे बदलून गेले आहे. व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम यांचा वाढता वापर, तिथे संवाद साधताना छोटे छोटे कीवर्डस्, इमोजी यांच्या भरमसाट वापरामुळे लेखनकला ही आपोआप मागे ढकलली जात आहे. घराबरोबर आता शाळांमध्येदेखील कीबोर्ड, टच स्क्रीन यांची उपलब्धता वाढली आहे. स्मार्टफोन आणि संगणकाच्या माध्यमातून शाळेचा अभ्यास आणि परीक्षांची तयारी करायच्या या काळात कागद, पेन आणि पेन्सिल कुठेतरी हरवले आहेत. हस्ताक्षराचा वापर करायलादेखील हळूहळू ही नवी पिढी विसरायला लागली आहे.
संशोधकांच्या मते, ‘जेन झेड’ ही पहिली पिढी असेल जिचे या अत्यंत महत्त्वाच्या अशा लेखनकलेवर प्रभुत्व नसेल. लेखन मेंदूच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे संशोधक सांगतात. मेंदूची स्मरणशक्ती वाढवणे, तुम्ही जे काही ऐकता, वाचता त्याचे ग्रहण करण्याची ताकद वाढवणे, मेंदूला इतर विविध कार्ये करण्यासाठी प्रेरणा देणे हे लेखनामुळे शक्य होते आणि टायपिंगमुळे नाही. मात्र आजच्या पिढीला जेव्हा काही लिहिण्यासाठी संगितले जाते, तेव्हा त्यातले बरेच लोक एकदम गोंधळून जातात. त्यांना काही शब्द नीट समजत नाहीत किंवा लिहीत असताना, काही अक्षरे आठवतानादेखील गोंधळ उडतो. शिक्षक, पालक आणि शिक्षा विभागाशी संबंधित धोरणींनी आता पुढाकार घेऊन या नव्या पिढीला लिखाणासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन संशोधक करीत आहेत.