शहरात प्लास्टिक बाटल्यांचा नाल्यांत खच, रस्त्यांवर जागोजागी कचऱ्याचे ढीग:नियमित साफसफाईअभावी शहराच्या वाढीव हद्द भागातील गटारी तुंबल्या
11 hours ago
1
प्लास्टिकच्या पिशव्यांतून भरून रस्त्यावर फेकलेले शिळे अन्न, ड्रेनेजच्या जवळ, रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत, पडक्या विहिरी आणि आेसाड जागेत सर्रास टाकण्यात येणारा कचरा, नाल्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचा साचलेला खच, असे चित्र शहरात दिसत आहे. शहर व शहरालगतच्या वाढीव हद्द भागातील गटारी साफ करणारे नियमित येत नसल्याने गटारी तुंबल्या आहेत. तर शहरात ठिकठिकाणी प्लास्टिक कचरा पडल्याचे दिसून येत आहे. मनपाने शहरातील साफ सफाईकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. गटारांमध्ये मातीबरोबरच प्लास्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थांची वेष्टनेही निघत आहेत. प्लास्टिकमुळे गटारी तुंबल्याचे चित्र आहे. प्लास्टिक विरोधात मोहिमा घेतल्या जातात. या अनुषंगाने प्लास्टिकच्या वापरावर बंदी आणि कुठेही कचरा टाकण्यावर बंदी घालण्यात आली होती. लोकांनाही सुका आणि ओला कचरा वेगळा करून देण्याचे सांगितले जात आहे. मात्र, या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक सापडत असल्याने नागरिकांनी प्लास्टिक कचरा नाल्यात आणि गटारांमध्ये फेकल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होण्यास अडथळा निर्माण होतो. या नाल्यांमध्ये अशा प्रकारचा कचरा पडू नये, यासाठी प्रशासनाला अधिक काळजी घेणे गरजेचे झाले आहे. पाणी जाण्याच्या ठिकाणी जाळी बसवून हा प्लास्टिकचा कचरा रोखला जाऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने तशा उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत. प्लास्टिक पिशव्या गुरांच्या पोटात रस्त्याच्या कडेला पडलेल्या कचऱ्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचे प्रमाण सर्वांत जास्त दिसून येते. या पिशव्या वाऱ्यामुळे उडून इतरत्र जातात. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांसह परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये टाकण्यात येणारे खाद्यपदार्थ मोकाट जनावरांना खाणे शक्य होत नाही. अनेकवेळा तो त्यांच्या पोटात जातो. गेल्या सहा महिन्यात अनेक गुरांच्या पोटातून प्लास्टिकच्या पिशव्या शस्त्रक्रिया करुन काढण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. मोकाट कुत्री, डुकरे विखुरतात कचरा अनेक नागरिक घरात प्लास्टिक पिशव्यांमध्ये कचरा, शिळे अन्न, खाद्यपदार्थ साठवल्यानंतर ती पिशवी घराबाहेर पडताना सोबत घेतात व रस्त्याने जाताना दुचाकीवरूनच कचराकुंडीच्या दिशेने फेकतात. बऱ्याच वेळा कचऱ्याची पिशवी कचराकुंडी ऐवजी बाजूलाच पडते. त्यामुळे कचराकुंडीच्या बाहेर पडलेल्या कचऱ्यात सर्वांत जास्त प्लास्टिक पिशव्या दिसत आहेत. या पिशव्यांमध्ये अन्नाचा शोध घेण्यासाठी मोकाट कुत्री, जनावरे मोठ्याप्रमाणावर येतात.त्यामुळे हा प्लास्टिकचा कचरा जर दोन ते तीन दिवस रस्त्यावर पडल्यास त्याची दुर्गंधी सुटत आहे. शहराच्या प्रत्येक भागात स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी संबंधित प्रभागातील स्वच्छता निरीक्षकांची आहे. आपल्या भागात गटारी,नाल्याची नियमित स्वच्छता न झाल्यास किवा शहरात कुठे गटारी तुंबल्या किंवा रस्त्यावर कचऱ्याचे ढीग दिसल्यास नागरिकांनी महापालिकेच्या संबंधित झोन कार्यालयात तक्रार करावी. त्याची तातडीने दखल घेतली जाईल.- संजय खोसे, स्वच्छता विभागप्रमुख, मनपा.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)