केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल टिप्पणी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यातील ट्रायल कोर्टाच्या कामकाजाला आज सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. केवळ पीडित व्यक्तीच फौजदारी मानहानीची तक्रार दाखल करू शकते. त्रयस्थ व्यक्तीच्या वतीने तक्रार दाखल करणे अशा खटल्यात मान्य नाही, असे सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर खंडपीठाने याप्रकरणी झारखंड सरकार आणि भाजप नेत्याला नोटीस बजावत उत्तर देण्याचे निर्देश दिले.
2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी झारखंडमधील चाईबासा येथे भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी शहा यांना खुनी म्हटले होते. यानंतर भाजप कार्यकर्ते नवीन झा यांनी 2019 मध्ये अमित शहा यांच्याविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. सुनावणीदरम्यान वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी राहुल गांधी यांची बाजू मांडली. तुम्ही पीडित व्यक्ती नसल्यास तक्रार दाखल करण्यासाठी तुम्हाला प्रॉक्सी कशी मिळेल, असा सवाल सिंघवी यांनी याचिकाकर्त्याला केला.