शिंदेंच्या ‘त्या’ आमदारांच्या मतदारसंघात दोन महिने होती प्रशिक्षित तरुणांची फौज:प्रचारात शिंदेसेनेतील नाराज पदाधिकाऱ्यांचा रोज दिला जात होता अहवाल
4 hours ago
1
उद्धव ठाकरेंना सोडून आपल्यासोबत आलेला एकही आमदार पराभूत होऊ नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात २५ उच्चशिक्षित आणि प्रशिक्षित तरुणांची फौज दोन महिन्यांपासून पाठवून ठेवली होती. हे सर्व तरुण बिहारमधून आले होते. त्यावरून शिंदे यांनी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची मदत घेतल्याचा कयास लावण्यात येतो आहे. या तरुणांनी दररोज आमदाराला नाराज पदाधिकारी, मतदारांचा अहवाल आमदाराला दिला होता. त्याचा परिणाम निकालात जाणवणार असल्याचे म्हटले जात आहे. लोकसभा लढलेले मतदारसंघ आणि त्यातील किती उमेदवार विजयी झाले यावरून राजकीय पक्षांचा ‘स्ट्राइक रेट’ काढला गेला. लोकसभा निवडणुकीत तो शरद पवार यांच्या पक्षाचा सर्वाधिक होता. विधानसभा निवणुकीतही त्यालाच महत्त्व असेल आणि त्यावरून नेत्याची आणि त्या पक्षाची लोकप्रियता मोजली जाईल हे तेव्हाच निश्चित झाले होते. ही बाब लक्षात घेऊन आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत यासाठी शिंदे तेव्हापासूनच कामाला लागले होते. सोबत आलेल्या प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात २५ प्रशिक्षित तरुण दोन महिन्यांपासून काम करीत होते. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार उमेदवारांनी कामात आणि संपर्कात बदल करणे अपेक्षित होते. ज्या उमेदवारांनी त्यांचे ऐकून वेळीच सुधारणा केल्या त्यांची विजयची शक्यता वाढली आहे, असे सूत्रांनी सांगितले. दर १५ दिवसांनी सर्वेक्षण अहवाल उत्तम इंग्रजी बोलू शकणारे हे तरुण मराठी भाषाही समजू शकत होते. त्या प्रत्येकाला गाडी देण्यात आली होती. त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्थाही संबंधित कंपनीतर्फे करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्यापैकी कोणीही कधीही उमेदवाराकडे एक रुपयाही मागितला नाही. आल्यानंतर १५ दिवसांनी पहिला आणि पुढच्या दर १५ दिवसांनी त्यांनी सर्वेक्षण अहवाल संबंधित उमेदवार आणि पक्षाच्या मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयाला सादर केला. त्यात कुठे कमी पडतो आहोत, कोण नाराज आहे, कोण विरोधात काम करतो आहे, कोणाला सोबत घेण्याने फरक पडणार आहे हेही सुचवण्यात आले होते. या सर्वेक्षणाशिवाय आवश्यकतेनुसार उमेदवाराची भेट घेऊन त्याला काही माहिती तोंडीही सांगितली जात होती. उमेदवाराकडून सुधारणा केली गेली तर त्याचीही नोंद ते घेत होते. मित्रपक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांबद्दलही ते बारीक माहिती ठेवत होते आणि ती उमेदवारांना देत होते. शिंदेसेनेच्या मुंबईतील पक्ष कार्यालयाकडूनही होते लक्ष उमेदवारांकडूनच मिळालेल्या माहितीनुसार शिंदे यांच्या शिवसेनेचे मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयही प्रत्येक मतदारसंघावर बारकाईने लक्ष ठेवून होते. बूथ कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मतदान केंद्रांवरील प्रतिनिधी यांना मुंबई कार्यालयाकडून अनपेक्षितपणे फोन यायचा आणि काही अडचण तर नाही ना, काम व्यवस्थित सुरू आहे ना अशी विचारणा केली जात होती. त्यामुळे त्यांच्याकडूनही बारकाईने काम झाले, असेही सूत्रांनी सांगितले. स्वत: एकनाथ शिंदे हे उमेदवारांच्या सतत संपर्कात होते. काही अडचण असल्यास लगेच संपर्क करण्याचेही ते वारंवार सांगत होते. त्याचाही चांगला परिणाम उमेदवार आणि त्यांच्या प्रचारावर झाला, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)