Published on
:
28 Nov 2024, 11:36 am
Updated on
:
28 Nov 2024, 11:36 am
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघांत घवघवीत मताधिक्य मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीला सहाही आमदार आपल्याच पक्षाचे असतील, असा आग्रह धरला. खासदारांच्या या भूमिकेच्या विरोधात महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय नेते यांनी एकत्र येऊन जाहीर निषेध केला. त्यानंतर अगदी अखेरच्या क्षणी खेड-आळंदीची जागा मित्रपक्ष शिवसेनेला (उबाठा) सोडण्यात आली. ही खेडची जागा सोडली, तर मतदारसंघातील आग्रहाने घेतलेल्या पाचही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा दारुण पराभव झाला. बारामतीप्रमाणेच शिरूर लोकसभा मतदारसंघातदेखील शरद पवार यांच्या खासदारांचा प्रभाव शून्य दिसला.
लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ. कोल्हे यांच्याविरोधात प्रचंड नाराजी असताना देखील केवळ शरद पवार यांच्या सहानुभूतीमुळे शिरूर लोकसभेतील जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, भोसरी आणि हडपसर या सहा मतदारसंघांत घवघवीत मताधिक्य मिळाले व मोठ्या फरकाने डॉ. कोल्हे खासदार झाले. डॉ. कोल्हे यांच्या यशामध्ये शरद पवार यांच्या सहानुभूतीबरोबरच आघाडीतील शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांनी मनापासून केलेल्या कामाचा मोठा वाटा आहे. यामुळेच महाविकास आघाडीला मिळालेल्या लोकसभेच्या यशानंतर विधानसभेसाठी शरद पवार गटासह मित्रपक्षांत मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या वाढली.
दरम्यान, निवडणुका जाहीर होण्यापूर्वी खा. डॉ. कोल्हे यांनी राज्यासह शिरूर लोकसभेतील सहा विधानसभा मतदारसंघांत शिवस्वराज्य यात्रा काढून विधानसभा निवडणुकीत सर्व जागांवर शरद पवार गटाचा दावा सांगितला. शिरूर लोकसभेतील खेड-आळंदी, भोसरीमध्ये शिवसेना आणि जुन्नर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा तसा चांगला प्रभाव होता. परंतु, या सर्व जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळाल्या पाहिजेत, असा आग्रह खा. कोल्हे यांनी धरला आणि पवारांनी देखील हा बालहट्ट पुरवला. परंतु, यामुळे संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खा. डॉ. कोल्हे यांच्याविरोधात जाहीर बंड पुकारले व सहापैकी किमान दोन जागा तरी शिवसेनेला (उबाठा) सोडा, असा आग्रह धरला. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस शिल्लक असताना खेड-आळंदी विधानसभेची जागा शिवसेना (उबाठा) पक्षाला सोडण्यात आली, तर जुन्नरमध्ये काँग्रेसचे नेते सत्यशील शेरकर यांना शदर पवार गटात येण्यास भाग पाडून ही जागा देखील शरद पवारांच्या चिन्हावर लढविण्यात आली. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पाच जागा हक्काने घेतल्या खऱ्या; पण एकही जागा त्यांना निवडून आणता आली नाही, हे मोठे अपयश म्हणावे लागेल.
याउलट खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिवसेना (उबाठा) पक्षाचे उमेदवार बाबाजी काळे घवघवीत मताधिक्य घेत निवडून आले आहेत, ही देखील खा. डॉ. अमोल कोल्हे यांना मोठी चपराक म्हणावी लागेल.