Published on
:
29 Nov 2024, 12:03 am
Updated on
:
29 Nov 2024, 12:03 am
सांगोला : सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये शेकापचे जुने व नवीन कार्यकर्ते एकत्र करुन तालुक्याच्या विकासाबाबत व स्व. गणपतराव देशमुख यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तालुक्यातील जनतेने एकत्र यावे, असे आवाहन डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केले. त्या आवाहनाला मतदारांनी प्रतिसाद दिल्याने डॉ. बाबासाहेब देशमुख हे विजयी झाले.
सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार शहाजीबापू पाटील व महाविकास आघाडीचे उबाठा गटाचे उमेदवार दीपक साळुंखे-पाटील यांनी उमेदवारी मिळवण्यात यश मिळवले. यामधील शहाजी पाटील यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सिनेअभिनेते गोविंदा हे आले. दीपक साळुंखे-पाटील यांच्या सभेला उद्धव ठाकरे हे आले. यांच्या सभांना मोठी गर्दी झाली. हे दोन्ही मराठा समाजाचे उमेदवार होते. यामुळे यांच्यात या समाजाची मत विभागणी झाली. यामुळे ते दोघेही पराभूत झाले. शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीमध्ये सहभागी होता. पण जागा वाटपाच्या वेळी शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारीही मिळाली नाही. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह होळकर यांच्या सभा झाल्या.
वरिष्ठ पातळीवरचे कोणीही नेते आले नाहीत. तरीही खचून न जाता डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी कसोशीने शेतकरी कामगार पक्षाचे जुने व नवे सर्व कार्यकर्ते एकत्र केले. त्यांना विश्वासात घेतले. शेकापचे केडर हे एकत्र करून जनतेशी संपर्क ठेवला. स्व. आमदार गणपतराव देशमुख यांना विजय संपादन करुनच श्रद्धांजली वाहूया, असे भावनिक आवाहन केले. त्याचबरोबर 2019 ला उमेदवार असलेले त्यांचे बंधू डॉ. अनिकेत देशमुख यांनाही बरोबर घेऊन धनगर समाजातील सर्व जनतेला जागृत केले. त्याचबरोबर अल्पसंख्याक समाजालाही बरोबर घेऊन मोठ्या जिद्दीने तळागाळात जाऊन संपर्क ठेवला. सर्वसामान्य जनतेची कामे मार्गी लावणे, तालुका भ्रष्टाचारमुक्त करणे, विकासकामे करणे या बाबींवर विशेष जनजागृती करुन विजय संपादन केला. डॉ. बाबासाहेब देशमुख यांना 25 हजार मतांचे लीड देऊन सांगोला तालुक्यातील जनतेनेही विश्वास टाकला आहे.