Sanjay Shirsat connected Shreekant Shinde : राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरु आहे. अशात एकनाथ शिंदे यांनी देखील मुख्यमंत्रिपदावर दावा केलेला आहे, अशातच शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी याबाबत एक मोठं विधान केलं आहे. संजय शिरसाट यांनी काय म्हटलंय? वाचा सविस्तर...
संजय शिरसाट, श्रीकांत शिंदेImage Credit source: Facebook
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत सध्या खल सुरु आहे. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. असं असतानाच एकनाथ शिंदे यांनी देखील मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. तर भाजपने मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात उपमुख्यमंत्रिपद किंवा केंद्रात मंत्रिपदाची ऑफर शिंदेंना दिल्याची माहिती आहे. या सगळ्यात जर शिंदे गटाने उपमुख्यमंत्रिपद घेण्याचं मान्य केलं. तर एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील अशी चर्चा रंगली आहे. यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. श्रीकांत शिंदे यांना राज्याच्या राजकारणात रस नाही. ते इथे येणार नाहीत. या बातम्या खोट्या आहेत, असं संजय शिरसाट म्हणालेत.
संजय शिरसाट हे एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी माध्यनमांशी संवाद साधला. मंत्रिपदासाठी कुठलीही लॉबिंग नाही. मी सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो. मुख्यमंत्रिपदासाठी अद्याप कुणालाही फोन आलेला नाही. फोन कधी आणि कुणाला येणार हे अद्याप सांगता येणार नाही, असं शिरसाट म्हणालेत.