शरद पवारांचे श्रीगोंदा तालुक्यावर विशेष लक्षpudhari
Published on
:
22 Nov 2024, 10:13 am
Updated on
:
22 Nov 2024, 10:13 am
अमोल बी. गव्हाणे
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघावर मजबूत पकड असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यंदाच्या निवडणुकीत मतदारसंघात एकही सभा न घेतल्याने येथील मतदारांचा हिरमोड झाला आहे. गेल्या 44 वर्षांत एक अपवाद वगळता शरद पवार यांनी या मतदारसंघात सभा घेऊन निवडणुकीत चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. पवार यांनी 2024 च्या निवडणुकीत सभा का घेतली नाही यावर आता खलबते सुरू आहेत.
शरद पवार यांचा मतदारसंघ हा श्रीगोंदा तालुक्याला लागून असल्याने त्यांचे श्रीगोंदा तालुक्यावर विशेष लक्ष राहिले. 1977 मध्ये पुलोदचे सरकार स्थापन करून शरद पवार मुख्यमंत्री झाल्यानंतर श्रीगोंद्यातील मतदारांना पवार यांच्याविषयी आकर्षण वाढले. 1980 मध्ये पवार यांनी कुंडलिकराव जगताप यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. पवारांच्या एस काँग्रेसची उमेदवारी जगताप यांना मिळाली होती. 1985 च्या विधानसभा निवडणुकीत आ. बबनराव पाचपुते यांच्यासाठी पवार यांनी सभा घेतली होती. या निवडणुकीत पाचपुते विजयी झाले होते. 1990 मध्ये शरद पवार काँग्रेसमध्ये गेले. त्या वेळी शिवाजीराव नागवडे यांच्यासाठी सभा घेतली; मात्र या निवडणुकीत नागवडे यांना पराभव स्वीकारावा लागला होता. 1995 मध्ये काँगे्रसने आ. बबनराव पाचपुते यांना उमेदवारी दिली. काँग्रेसकडून बबनराव पाचपुते, भाजपकडून घनश्याम शेलार तर बाबासाहेब भोस हे अपक्ष निवडणूक लढले होते. या तिरंगी लढतीत आ. पाचपुते यांचा विजय झाला होता.
1999 मध्ये शरद पवार यांनी काँग्रेसशी फारकत घेत राष्ट्रवादी काँगे्रसची स्थापना केली. या पक्ष स्थापनेत आ. बबनराव पाचपुते यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. विधानसभा निवडणुकीत आ. बबनराव पाचपुते व काँग्रेसचे शिवाजीराव नागवडे यांच्यात एकास एक लढत झाली. या लढतीत आ. पाचपुते यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत शरद पवार यांनी आ. पाचपुते यांच्यासाठी दोन सभा घेतल्या होत्या. 2004 मध्ये माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांना उमेदवारी मिळाल्याने आ. पाचपुते यांनी अपक्ष उमेदवारी केली. त्या वेळी शरद पवार यांनी श्रीगोंदा येथे सभा घेण्याचे टाळत एक प्रकारे पाचपुते यांना छुपा पाठिंबा दिला होता. पाचपुते यांनी बंडखोरी केल्याने त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली होती; मात्र ते निवडून येताच ही कारवाई मागे घेत पहिल्याच यादीत त्यांचे कॅबिनेट मंत्री म्हणून नाव आले होते.
2009मध्ये आ. पाचपुते यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली. पवारांनी पाचपुते यांच्यासाठी सभा घेऊन भाजपकडून उमेदवारी करणार्या राजेंद्र नागवडे यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना पराभूत केले होते. 2014 मध्ये तालुक्याचे राजकीय संदर्भ बदलले. पाचपुते यांनी शरद पवार यांची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला अन् विधानसभेची उमेदवारी केली. पाचपुते यांची ही राजकीय भूमिका पवार यांना खटकली. त्यांनी पाचपुतेंच्या पराभवासाठी विरोधकांची मोट बांधली. पक्षाकडून सर्वे केला. त्यात राहुल जगताप यांचे नाव पुढे आले. जगताप यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवत त्यांच्या मागे ताकद उभी केली. सभा घेऊन पाचपुतेंवर जोरदार टीका केली. पवार यांच्या या सभेचा मोठा परिणाम झाला आणि पाचपुते यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पाचपुते यांच्यासाठी हा मोठा धक्का होता.
2019 च्या निवडणुकीत राहुल जगताप यांनी निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेतली. त्यांच्याऐवजी घनश्याम शेलार यांनी उमेदवारी केली. एकाकी वाटणार्या या निवडणुकीत शरद पवार यांची सभा झाली. या सभेत पवारांनी पाचपुते यांना फटकारले होते. त्या सभेनंतर वातावरण फिरले अन् एकाकी वाटणार्या निवडणुकीत रंगत आली. शेलार यांचा या निवडणुकीत निसटता पराभव झाला. शरद पवार यांची ही सभा आजही येथील मतदारांच्या लक्षात आहे.
2024 च्या निवडणुकीत उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये एकमत झाले नाही. ही जागा राष्ट्रवादीकडे असताना राजकीय तडजोडीत शिवसेनेच्या वाट्याला गेली. अर्थात ही जागा सोडण्यास पवार तयार नव्हते; मात्र राज्यातील आघाडीला अडचण नको म्हणून ही जागा शिवसेनेला सोडण्यात आली. श्रीगोंद्यात सभा घ्यावी असा पवार यांच्याकडे आग्रह धरण्यात आला; मात्र त्यांनी श्रीगोंदा येथे सभा घेण्याचे टाळले. ही सभा का घेतली नाही हे सांगण्यासाठी कोणा जोतिष्याची गरज नाही.
गेल्या 44 वर्षांत शरद पवार अन् श्रीगोंदा हे एक समीकरण बनले आहे. त्यांची सभा ऐकण्यासाठी लोकांत उत्सुकता असते. त्यांच्या भाषणात असणारे राजकीय मुद्दे, संदर्भ, विरोधकांवर शेलक्या शब्दात टीका टिप्पणी नेहमीच खुमासदार असते. दोन अपवाद वगळले तर शरद पवार यांची विधानसभा निवडणुकीत सभा ही ठरलेली असते. अर्थात 2004 मध्ये सभा न घेतल्याने त्याचा फायदा अपक्ष उमेदवार आ.बबनराव पाचपुते यांना फायदा झाला होता. आता 2024 मध्ये त्यांनी येथे सभा घेण्याचे टाळल्याने नेमका काय परिणाम होतो, हे पाहावे लागणार आहे.